डोंबिवली- चटपटीत, झटपट, झणझणीत, वेष्टण बंद खाद्याचे कितीही चवीदार पदार्थ बाजारात आले तरी तृण धान्यातून मिळणारी पौष्टिकता शरीर सुदृढतेसाठी खूप महत्वाची आहे. याची जाणीव जगाला झाली आहे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे, अशी माहिती डोंबिवलीतील ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ आणि जनरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी दिली.

जनरल एज्युकेशन संस्थेच्या ब्लॉसम इंटरनॅशनल शाळेतर्फे ११ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत तृण धान्य आणि उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन आयोजित केले आहे. डॉ. कोल्हटकर यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून हे प्रदर्शन आयोजित केले आहे. तृणधान्याची प्रत्येकाला ओळख व्हावी, या धान्याची शरीरासाठी प्रत्येकाला किती गरज आहे याची माहिती माहिती व्हावी, या उद्देशातून हे प्रदर्शन आणि तज्ज्ञ मार्गदर्शकाचे व्याख्यान आयोजित केले आहे.

हेही वाचा >>> कल्याण-वसई राष्ट्रीय जलमार्ग: भिवंडी जवळील काल्हेर येथे पाणतळ कामासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ

जागतिक वातावरणाचा कल बघता शाश्वत विकास, सुदृढ शरीरासाठी तृण धान्ये महत्वाची आहेत. म्हणून २०१८ मध्ये देशात राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सरकारने तृणधान्यांचे महत्व ओळखून संयुक्त राष्ट्रसंघात तृणधान्य वर्ष जाहीर करावे म्हणून दोन वर्ष प्रयत्न केले. चालू वर्षापासून युनोच्या पुढाकारामुळे तृण धान्य वर्ष आपण साजरे करत आहोत, असे डाॅ. कोल्हटकर यांनी सांगितले.

भारताची भूमी तृण धान्य उत्पादनाला पोषक आहे. जगाच्या उत्पादनात भारत ४१ टक्के तृण धान्याचे उत्पादन घेऊन आघाडीवर आहे. या देशाची भूमी तृण धान्यांचे कोठार व्हावे म्हणून केंद्र सरकारने प्रयत्न चालविले आहेत. चीन, माली, नायझेरिया, इथोपिया देशांमध्ये तृण धान्यांची सर्वाधिक लागवड होते. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, तमीळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यांमध्ये १०० टक्के तृणधान्याची लागवड होते. उत्तरेतील तीन राज्ये ८१ टक्के या धान्याचे उत्पादन घेतात. महाराष्ट्र या लागवडीत अग्रेसर असावा म्हणून शासनाने २०० कोटीचे कृषी विभागासाठी पॅकेज जाहीर केले आहे, असे डाॅ. कोल्हटकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाणे : यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात ३७६ ग्राहकांनी केली घरखरेदीसाठी नोंदणी, ९७० कोटी रुपयांचे गृहकर्जाला मंजुरी

देशाला पाच हजार वर्षापूर्वीचा तृण धान्यांचा वारसा आहे. तो पुढे न्यावा, तृण धान्य लागवडीसाठी नवउद्यमींनी पुढे यावे, नवीन उत्पादने या धान्यातून घ्यावीत. या धान्याचे लागवड क्षेत्र वाढावे म्हणून शासनाने ज्वारी, बाजारी, नाचणीच्या आधारभूत हमीभाव किमतीत ६५ ते ८८ टक्के वाढ केली आहे. बारमाही पध्दतीने ही पिके घेता येतात. कमी पाण्यावर, विनाखत ती वाढतात. जमिनीचा कस वाढविण्यात या धान्यांचा महत्वाचा वाटा आहे. भात, गव्हानंतर ज्वारी, बाजरी, नागली(रागी), सावा, वरई, कुटकी, कनगी, राळे, राजगिरा या तृणधान्याची देशात अधिक प्रमाणात लागवड व्हावी यादृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे, असे डॉ. कोल्हटकर म्हणाले.

तृणधान्यातील पौष्टिकता

जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चटपटीत, तळलेले, वेष्टन बंद, दुधाचे पदार्थ आपण खातो. हे पदार्थ पोटातील आजार वाढवितात. नियमितच्या व्याधींना आपण बळी पडत जातो. तृण धान्यांमध्ये सर्व प्रकारची जीवनसत्व असतात. शऱीरातील चलनवलन होण्यासाठी स्निग्ध, तंतूमय, पिष्टमय पदार्थ महत्वाची भूमिका बजावतात. ते आपणास तृणधान्यातून मिळतात. तृण धान्य खाण्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, मधुमेह, कर्करोगास प्रतिबंध होतो. बध्दकोष्ठता, उच्च रक्तदाब नियंत्रणात, शरीरातील विषारी पदार्थ कमी होतात.

या धान्यांचा आहारातील अलीकडे वापर कमी झाला आहे. त्यामुळे मानसिक तणाव, हदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता असे आजार वाढत आहेत, असे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले.

लागवड घटली

१९६५ पर्यंत आपल्या आहारात २० टक्के तृण धान्याचे प्रमाण होते. हरितक्रांती नंतर ते सहा टक्केवर आले. ज्वारी लागवड १२ टक्के घसरली आहे. गहू उत्पादन १६ टक्के वाढले आहे. संकरित बियाणे वापर वाढल्याने धान्यातील पोष्टिकता संपली आहे. ४० वर्षापूर्वी ज्वारीचा प्रति माणसी वापर १९ किलो होता, तो आता दोन किलोवर आला आहे. शहरी भागात हे प्रमाण ११ किलोवरुन एक किलोवर आले आहे. ६० वर्षात नाचणीचे क्षेत्र दोन लाख हेक्टरवरुन ०.७३ हेक्टरवर आले आहे. बाजरी १६ लाख हेक्टरवरुन पाच लाख हेक्टरवर, ज्वारी ६२ लाखावरुन १६लाख हेक्टरवर आले आहे, असो कोल्हटकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आरोग्यमान उंचावे, शरीराची सुदृढता कायम राहावी यासाठी तृणधान्याचा आहारात अधिक वापर झाला पाहिजे. तृणधान्य प्रचारासाठी शेतकरी, डॉक्टर, विविध क्षेत्रातील सेवक, कार्यकर्ते यांनी पुढे येऊन एक लोक चळवळ देशभर सुरू करावी. खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष साजरे करावे.” डॉ. उल्हास कोल्हटकर, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डोंबिवली