लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क रहावे. शहरी व ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये साथरोग नियंत्रणासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा. तर गृह विभागाने प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांच्या मदतीसाठी ‘ईमरजन्सी हेल्पलाईन क्रमांका’ची सुविधा सुरू करावी. अशा स्पष्ट सूचना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्य प्रणालीद्वारे पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती रोखण्यासाठी उपाययोजना बैठक पार पडली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

आणखी वाचा-डोंबिवलीत फडके रस्त्यावरील झाड कोसळले, जीवित हानी नाही

हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पाणी साचणे, नाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात. पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी महानगरपालिका, नगर पालिका यांनी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करावी. महापालिका, नगरपरिषदांनी आतापर्यंत नालेसफाई पूर्ण केली आहे. परंतु काही वेळेस एकदम येणाऱ्या पावसामुळे अनेकवेळेस गटारीमध्ये घाण साचून नाले तुंबतात. या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवण्यात यावे.

धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करावयाचे असल्यास तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीजेची सुविधा असावी अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

आणखी वाचा-कल्याण: लोकलमध्ये लंपास झालेले दागिने पुन्हा मिळाले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात १० बहुउद्देशीय निवारा केंद्र

आपत्त्कालीन परिस्थितीत मदत पोचविण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संबंधित गावांना पुरेशा प्रमाणात साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. शोध व बचाव कार्यासाठी तहसीलनिहाय पथक तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी सांगितले. तर जिल्ह्यात दहा ठिकाणी बहुद्देशीय निवारा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. दरडप्रवण क्षेत्रातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच १५२ पूरप्रवण गावांमध्ये उपाय योजना करण्याचे आदेश संबंधित प्रशासनास देण्यात आले आहेत. धोकादायक पूल, खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शिनगारे यांनी या बैठकीत दिली.