डोंबिवली – देशातील प्रत्येक राष्ट्रपुरूष, सन्मानिय व्यक्ति, सामान्य यांचा मान राखलाच गेला पाहिजे. कोणीही कोणत्याही जाती, धर्माच्या व्यक्तिबद्दल कोणतेही पुरावे नसताना मानहानीकारक व्यक्त करत असेल तर अशा व्यक्तिची शासनाने गंभीर दखल घ्यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. प्रसंगी अशा व्यक्तिला तुरुंगात धाडावे. जेणेकरून कोणीही कोणाचा अपमान, मानहानी करण्यास धजावणार नाही, असे प्रतिपादन जेष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी येथे केले.

ब्राह्मण महासंघातर्फे सर्व संलग्न ब्राह्मण ज्ञातीमधील संस्थांचे संमेलन टिळकनगर शाळेच्या मैदानात रविवारी आयोजित केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार आफळे बोलत होते. यावेळी ब्राह्मण महासंघ डोंबिवली शाखेचे अध्यक्ष मानस पिंगळे, उपाध्यक्ष नीलेश वीरकर, अनिकेत घमंडी, माजी नगरसेवक राहुल दामले, कोषाध्यक्ष जयंत कुलकर्णी, उल्हास दाते, सुनील जोशी उपस्थित होते.

कोणीही कोणाचा पुरावे नसताना अपमान, जाहीरपणे मानहानी करत असेल तर अशा प्रकरणांची ब्राह्मण महासंघ डोंबिवली शाखेने गंभीर दखल घ्यावी. याविषयी शासनाशी संपर्क करून संबंधितांवर कारवाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी केली. या सूचनेप्रमाणे ब्राह्मण महासंघाने संमेलनात एक ठराव संमत केला. सर्व उपस्थितांच्या समक्ष एक निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी ब्राह्मण ज्ञातीमधील सामाजिक कार्यकर्ते आप्पा जोशी, तत्वज्ञानाच्या गाढ्या अभ्यासक डाॅ. प्रा. शुभदा जोशी, शास्त्रज्ञ डाॅ. अनुपमा कुलकर्णी, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल स्वरुप पुराणिक, अभिराज वीरकर, कला क्षेत्र वृषांक कवठेकर, शैक्षणिक क्षेत्र वृषाली राजवाडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गायक किरण फाटक आणि सहकाऱ्यांचा गायनाचा कार्यक्रम झाला.