भाजपसह शिवसेनेवरही टीकास्त्र
पैसा कमावता यावा म्हणून आधी व्यापाऱ्यांनी डाळींची साठेबाजी केली. भाव कडाडताच ओरड झाल्यामुळे या साठेबाजांवर छापे मारण्यात आले. महाराष्ट्रात ७८ हजार टन डाळ जप्त करण्यात आली. कोण होते हे साठेबाज, कोण होते हे व्यापारी तसेच या साठेबाजीतून कोणी नफा कमावला, असे प्रश्न करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारच्या संगनमतामधून व्यापाऱ्यांनी डाळीची साठेबाजी करून पैसा कमावला, असा आरोप डोंबिवलीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केला.
व्यापाऱ्यांचे हित सांभाळणारी ही भाजप सरकारे आहेत. संधी मिळते तेव्हा व्यापाऱ्यांना पैसे कमवून देण्यासाठी पुढाकार घेतला जातो. आणि सामान्यांची कदर न करता त्यांना झोडपले जाते, याची प्रचीती जनता कडाडल्या डाळींच्या माध्यमातून घेत आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसचे दत्तनगर, आयरे प्रभागातील उमेदवार प्रणव आणि राहुल संतोष केणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
मागील वीस र्वष लुटालूट करून थकलेले आता विभक्त होऊन अधिक लूट करण्यास मिळावी म्हणून स्वतंत्रपणे लढत आहेत. यांना फक्त निवडणुकीचे राजकारण जमते. विकासाशी यांना काहीही देणे-घेणे नाही, अशी टीका चव्हाण यांनी महापालिकेतील शिवसेना, भाजपवर केली. कल्याण-डोंबिवली शहरांना गोंडस स्मार्ट सिटीचे गाजर मुख्यमंत्र्यांकडून दाखवण्यात आले आहे. या घोषणेमुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी हे मूळ प्रचारक आहेत. पण त्यांनी देशाला मालाचे रूप देऊन त्याची जाहिरात करण्यासाठी देशोदेशी फिरू नये. भाजप सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे निरीक्षक संजय चौपाणे, आमदार संजय दत्त, माजी खासदार संजीव नाईक, ठाण्याचे बाळकृष्ण पूर्णेकर, प्रदेश नेते संतोष केणे, ब्रिजकिशोर दत्त आदी मान्यवर उपस्थित होते.
महागाई नियंत्रणासाठी प्रयत्न नाही..
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १३० डॉलर होते. ते भाजप सरकारच्या काळात ४६ वर आले आहेत. आयातीसाठी कमी पैसा लागतो. या आर्थिक हालचालींमुळे महागाई नियंत्रणात येऊ शकते. पण तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. फक्त व्यापारी हिताची गणिते भाजप सरकारकडून केली जात आहेत. कोणतेही नियोजन नाही. त्याचे चटके सर्वसामान्यांना महागाईच्या माध्यमातून बसत आहेत, असे चव्हाण म्हणाले.