मैदानातील रोजच्या विक्री केंद्रांऐवजी आठवडा बाजार
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून मुक्त होऊन शेतातला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यत पोहचावा यासाठी राज्य सरकार विविध मार्गानी प्रयत्नशील असले तरी मुंबई, ठाण्यात शेतकरी बाजार भरविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना दररोज शहरात भाजीविक्रीसाठी येणारे शेतकरीच सापडत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. पुणे, जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव यांसारख्या कृषिसंपन्न भागातील भाजी थेट ठाण्याच्या बाजारात मिळावी यासाठी महापालिकेने शहरातील काही मैदाने स्वस्त भाजी विक्री केंद्रासाठी खुली करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या मैदानांमध्ये दररोज भाजी आणून विकण्यासाठी पुरेसे शेतकरीच मिळत नसल्याने आता स्वस्त भाज्यांचा आठवडी बाजार भरविण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
राज्य सरकारने मध्यंतरी बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी शेतातला माल थेट ग्राहकांपर्यत पोहचविण्याची मुभा देऊ केली आहे. या निर्णयानुसार शेतकरी आपला माल थेट मुंबई, ठाण्याच्या बाजारात आणून विकू शकतात. असे असले तरी अजूनही मुंबईस लागणारा ९२ टक्के भाजीपाला वाशीच्या घाऊक बाजारातच रिकामा केला जात आहे. त्यामुळे नियंत्रण मुक्त बाजार या सरकारच्या संकल्पनेला मोठा धक्का पोहचत आहे. शेतातला माल थेट ग्राहकांपर्यत नेण्याच्या प्रयत्नांना राजकीय हातभार लागावा यासाठी भाजपच्या स्थानिक आमदार तसेच नेत्यांना स्वस्त भाजी केंद्राचे प्रयोग सुरू करण्याच्या सूचना राज्य नेतृत्वाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई यांसारख्या भागात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वस्त भाजी बाजाराची संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. ठाण्यात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी स्वस्त भाजी विक्री केंद्रासाठी महापालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर तीन मैदाने उपलब्ध करून घेतली आहेत. या मैदानांमध्ये दररोज भाजी विक्री व्हावी अशा स्वरूपाची तयारी करण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात पुणे येथे सुरू झालेल्या आठवडी बाजाराच्या स्वरूपात ठाणे येथील हे केंद्र चालविले जाणार आहे. संस्कार संस्था आणि पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील गावदेवी मैदानात येत्या सहा ऑगस्ट रोजी हा आठवडा बाजार भरणार आहे.

स्वस्त दरात भाजीविक्री केंद्र ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात असल्याने या योजनेला सुरुवातीला आठवडा बाजाराचे स्वरूप देण्यात आले आहे. मुंबईत थेट भाजी विक्रीची व्यवस्था उभी होत आहे हे लक्षात येताच शेतकरी नियमित स्वरूपात शहरात येतील. त्यामुळे शेतकरी मुंबईत येण्यास तयार नाहीत असा निष्कर्ष आताच काढणे योग्य ठरणार नाही.
-संजय केळकर, आमदार

शेतातला माल थेट ग्राहकांपर्यत ही संकल्पना घोषणेसाठी चांगली वाटत असली तरी जोपर्यंत शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था सरकार उभी करत नाही तोवर शेतकरी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत दैनंदिन विक्रीसाठी येणार नाही. मैदाने ही खेळण्यासाठी असतात. त्या ठिकाणी अशी भाजीविक्री केंद्र उभारणे हे खरे तर हास्यास्पद आहे. शिवाय अशा जागा काही बेकायदा व्यापाऱ्यांनी उद्या बळकविण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
-संजय पानसरे, घाऊक व्यापारी