कल्याण : शहापूर तालुक्यातून वाहत येत असलेल्या भातसा नदीच्या पाण्यावर कल्याण तालुक्यातील वावेघर, वालकस परिसरात तेलकट सफेद रंगाचा तवंग वाहत असल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी हा तवंग कोठुन वाहत येतो याचा शोध सुरू केला आहे.
भातसा नदीच्या पाण्यावरुन सफेद रंगाचा तवंग वाहत असल्याची माहिती मिळताच कल्याण तालुक्यातील वावेघर, वालकस, बेहरे,खडवली, सोर, कोशिंबी, ओझर्ली भागातील ग्रामस्थांनी नदी काठी धाव घेतली आहे. या भागातील ग्रामस्थ, पशुपालकांची नदी काठी भात शेती, फळ, फूलांची लागवड आहे. अनेक पशुपालक आपली गाई, म्हशी नदीकाठी चरण्यासाठी आणतात.

या रसायनाच्या पाण्यापासून गाव परिसरातील जीविताला धोका नको म्हणून वालकस गावचे जागरुक रहिवासी दिनेश बेलकरे यांनी यासंदर्भात महसूल, प्रदूषण नियंत्रण, पोलीस अधिकारी यांना कळविले आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनी यासंदर्भात ग्रामस्थांना जागरुक केले आहे. नदीवर वाहून येत असलेला सफेद रासायनिक तवंग हा नदी काठच्या एखाद्या कंपनीने थेट पाण्यात सोडून दिला असावा असा संशय या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : कल्याण डोंबिवलीत मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गावांमधील अनेक महिला भातसा नदीवर नियमित कपडे धुण्यासाठी जातात. फिरत्या मजूर लोकांच्या वस्त्या नदी काठी आहेत. ते नियमित भातसा नदीच्या पाण्याचा वापर करतात. शहापूर पासून वाहत असलेल्या पाण्यात सफेद पाण्याचा तवंग आहे का याची माहिती घेण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली आहे. ज्यांनी हे सफेद रासायनिक पाणी नदी पात्रात सोडले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.