|| आकांशा मोहिते

गावठी कोंबडी ३० तर ब्रॉयलर २० रुपयांनी महाग

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर पट्टय़ात दोन आठवडय़ापूर्वी बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे प्रशासनाला आढळले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे काही हजार कोंबडय़ा नष्ट केल्या. या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री फार्मधारकांनी गेल्या काही दिवसांपासून कोंबडय़ाच्या घाऊक विक्रीचे प्रमाण कमी केल्याने किरकोळ बाजारात गावठी आणि ब्रॉयलर कोंबडय़ांच्या किंमतीत मोठी वाढ पहायला मिळत आहे. ग्राहकांकडून मोठी मागणी असली तरी विक्रीसाठी येणाऱ्या कोंबडय़ांचे प्रमाण आटल्याने ३० ते ४० रुपयांनी कोंबडीचे मांस महागले आहे.

  दोन आठवडय़ांपूर्वी जिल्ह्यातील शहापूर भागात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने जिल्हा प्रशासनातर्फे हजारो कोंबडय़ा नष्ट करण्यात आल्या. या भीतीने जिल्ह्यातील आणि त्याचबरोबर अलिबाग, पेण या भागातील अनेक छोटय़ा पोल्ट्री फार्मधारकांनी खबरदारी म्हणून विक्रीसाठी कोंबडय़ांची आवक कमी ठेवली आहे. असे असले तरी किरकोळ बाजारात कोंबडी, अंडी, मटण यांची मागणी             अजूनही  कायम आहे. त्यामुळे स्थानिक चिकन विक्रेत्यांना कोंबडय़ांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी  राज्यातील विविध भागातील मोठय़ा पोल्ट्री फार्म कंपन्यांकडून कोंबडय़ा विकत घेण्यास सुरुवात केली आहे.

स्थानिक पोल्ट्रीफार्मपेक्षा मोठय़ा पोल्ट्री फार्म कंपनींचा कोंबडय़ा देखभालीचा खर्च जास्त असतो. त्यामुळे या मोठय़ा कंपन्यांकडून चिकन विक्रेत्यांना अधिकचे पैसे मोजून कोंबडय़ा विकत घ्यावा लागत आहे. त्याचबरोबर राज्यातील पुणे, कर्जत अशा विविध भागातून कोंबडय़ांची आवक करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील होत आहे.

गावठी कोंबडी २७० रुपये

मागील आठवडय़ापूर्वी २४० रुपयांनी विकली जाणारी गावठी कोंबडी सध्या २७० रुपयांनी विकली जात आहे. तर, १४० रुपयांनी विकली जाणारी ब्रॉयलर कोंबडी सद्यस्थितीला १६० रुपयांनी विकली जात असल्याचे कोंबडी विकेत्यांकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बर्ड फ्लूच्या भीतीने या पोल्ट्री फार्म धारकांनी विक्रीसाठी कमी कोंबडय़ांची आवक कमी ठेवली आहे. त्यामुळे पुणे, सातारा, कर्जत या भागातील मोठय़ा कंपन्यांकडून अधिकचे पैसे मोजून कोंबडय़ा विकत घेण्यात येत आहेत. तसेच वाहतुकीचा खर्च देखील होत आहे. यामुळे कोंबडय़ांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. येत्या धुलिवंदनाच्या तोंडावर कोंबडय़ांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.   – चंद्रशेखर तेरडे, कोंबडी विक्रेते, ठाणे</strong>