ठाणे : ठाणे जिल्हा हा शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेना फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. या जिल्ह्यात होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी दिवसभर दौरा करणार असून त्यात भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून आयोजित मंडळांना भेटी देत आहेत. येत्या काही महिन्यात जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
मुंबईसह, ठाणे आणि उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंधित मंडळानी दहीहंडी उत्सव आयोजित केला आहे. याठिकाणी गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सकाळपासूनच दिसू लागला आहे. ठाणे शहरात टेंभी नाका, तलावपाळी, रघुनाथ नगर, वर्तकनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड याठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळतात.
यंदाच्या वर्षी या दहीहंडीला लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत. . या जिल्ह्यात होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभर दौरा करणार असून त्यात भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून आयोजित मंडळांना भेटी देत आहेत.
असा आहे दौरा
ठाण्यातील रघुनाथ नगरमधील संकल्प चौकातील माजी आमदार रविंद्र फाटक यांची दहीहंडी, आनंद दिघे यांनी सुरू केलेली टेंभीनाका येथील टेंभी नाका मित्र मंडळ आयोजित दहीहंडी, भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या गोकुळनगर येथील शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहिहंडी महोत्सव, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आयोजित केलेला दहीहंडी उत्सव, वर्तकनगर येथे शिंदेंच्या शिवसेनेचे युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक यांचा संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित दहिहंडी उत्सव, हिरानंदानी मिडोज, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ भाजप आमदार शिवाजी पाटील यांचा स्वामी प्रतिष्ठान दहिहंडी उत्सव, मानपाडा टिकूजीनी वाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात भाजप माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे यांचा नवयुग मित्रमंडळ आयोजित दहिहंडी महोत्सव या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटी देणार आहेत. दुपारी सुरू होणार हा दौरा सायंकाळी संपणार आहे.