संगीत तसेच अन्य कला प्रकारांबरोबरच सध्या खाद्यपदार्थाच्या विश्वातही फ्यूजनचा जमाना आहे. दोन भिन्न चवींच्या पदार्थाचे बेमालूम मिश्रण करून त्यातून नव्या चवीचा आविष्कार घडविला जातो. खवय्ये अशा पदार्थाना अधिक पसंती देऊ लागले आहेत. मराठमोळ्या संस्कृतीचे ठाणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असले तरी आता त्याचबरोबरीने हे एक बहुप्रांतीय शहर आहे. त्यामुळे केवळ देशभरातीलच नव्हे तर जगभरातील विविध प्रांतांतील पदार्थ येथे मिळू लागले आहेत. त्यामुळे इथे आपल्याला पारंपारिक चायनीज, इटालियन, अमेरिकन पदार्थाबरोबरच त्यांचे फ्यूजनही मिळतात. ठाण्यातील जिंबाज एक्स्प्रेस हे कॉर्नर देशी-विदेशी पदार्थाचे फ्यूजन मिळणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे नावीन्यपूर्ण चवीचे येथील पदार्थ किफायतशीर दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे नव्या चवीच्या भक्त मंडळींची झुंबड उडालेली दिसते.
अनुश्री दास आणि प्रसनजीत बागची यांनी सात महिन्यांपूर्वी चिंजाब एक्स्प्रेस हे कॉर्नर सुरू केले. येथे आपल्याला चिनी आणि पंजाबी चवीचे एकूण ७५ खाद्यपदार्थ मिळतात.
विविध प्रकारचे स्टफ्ड रोल्स म्हणजे तरुणाईचं आवडतं खाद्य. इथे आपल्याला पराठा किंवा रोटीमध्ये टिक्का टाकून केलेला टिक्का रोल, मलाई टिक्का रोल, कबाब रोल, गोड, तिखट आणि थोडी आंबट चव असलेला क्रिस्पी हनी लेमन रोल, क्रिस्पी चिली रोल अशा विविध प्रकारच्या रोल्सची चव चाखायला मिळते. सकाळी किंवा संध्याकाळी भुकेला शमविण्यासाठी थोडी पोटपूजा करावी म्हणून आपण स्नॅक्सकडे वळतो. त्यासाठी इथे आपल्याला छोले भटुरे, चिनी पद्धतीने बनविलेल्या ऑम्लेटचे तीन ते चार प्रकार मिळतात. ऑम्लेटच्या मधील भागात सॉस टाकला जातो. त्यानंतर संपूर्ण ऑम्लेट गुंडाळून त्यातून ‘एग्स फू युंग’ हा एक आगळावेगळा पदार्थ तयार केला जातो. चायनीज चॉप्सी, मंच्युरियन बॉल्स, चिकन खिमाच्या गोळ्यात आइसक्रीम स्टिक लावून तयार केलेले मिटबॉल लॉलीपॉप असे चवदार स्नॅक्ससुद्धा इथे उपलब्ध आहेत.
सध्या चिनी पद्धतीने बनविलेल्या पदार्थाना घरोघरी मागणी आहे. हॉट अँड सोर सूप, शेजवान नूडल्स सूप, शोर्बा सूप असे काही सूप्स, क्रिस्पी चिली, बटर गार्लिक असे काही मस्त स्टार्टर्स, हक्का नूडल्स, फ्राइड राइस, सिंगापूर नूडल्स आणि राइस, शेर्पा राईस असे रोजच्या माहितीतले चायनीज पदार्थ इथे आपल्याला मिळतात. या दररोजच्या चायनीज पदार्थाबरोबरच इथे आपल्याला वैशिष्टय़पूर्ण अशा ग्रेव्हीमधील पदार्थही मिळतात. चिकन किंवा पनीरच्या क्रिस्पीमध्ये मिरची, मध आणि चवीपुरते लिंबू टाकून तयार केलेला क्रिस्पी चिली हनी लेमन, क्रिस्पी मंगोलियन, जिंजर गार्लिक, खरपूस भाजलेल्या चिकनला चिंचेचे पाणी देऊन तयार केलेला
बॉरबॉन असे अनेक पदार्थ इथे मिळतात. बॉरबॉन हे हाँगकाँगचे प्रसिद्ध स्ट्रीटफूड आहे, जे नुसत्या भाताबरोबर खाल्ले तर खूप छान लागते. इथे कोलकत्तामधील सुप्रसिद्ध कुंग पाव आणि हुनान सॉस हे ग्रेव्हीमधील पदार्थही मिळतात. कुंग पाव हा चिकन चिलीसारखाच पदार्थ आहे. चवीला तिखट असलेला हा पदार्थ त्यातील भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामुळे मऊ आणि मजेदार लागतो.
पंजाबी पद्धतीच्या पदार्थामध्ये आपल्याला चिकन किंवा कोळंबी पुलाव, शाकाहारी पुलाव, तुपातील खिचडी, कबाब, टिक्का अशा काही दररोजच्या खाण्यातल्या पदार्थाबरोबरच नेपाळमध्ये अंडय़ापासून बनविली जाणारी वैेशिष्टय़पूर्ण स्टीम्ड एग्ज करी मिळते.
चिंजाब एक्स्प्रेसचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथे मिळणारा भोपाळी स्टय़ू आणि एग्स केजरीवाल. ‘भोपाळी स्टय़ू’ हा एक भन्नाट पदार्थ आहे. कांद्याला कॉर्नफ्लॉवर आणि मीठ लावून ते छान तळून घेतले जाते.
त्यानंतर त्यात बोनलेस चिकन किंवा पनीर टाकून ते मिश्रण एकजीव केले जाते. एग्ज केजरीवाल ही खास मुंबईची डिश आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध वेलिंग्टन क्लबमधील एक सदस्य देविप्रसाद केजरीवाल यांनी अंडय़ाचा नवीन पदार्थ खावा म्हणून क्लबमधील कँटीनच्या मुख्य आचार्याला ही नवी स्वादिष्ट अंडय़ाची डिश करायला सांगितले. त्यामुळे या डिशला त्यांचेच नाव देण्यात आले.
चिंजाब एक्स्प्रेस
क्विक सव्र्हिस कॉर्नर १४, कांचनपुष्प, वाघबीळ, पंचामृत बसस्टॉपच्या समोर, घोडबंदर रोड, ठाणे (प.)