ठाणे : भिवंडी येथील टेमघर भागात स्टेम प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा केंद्रावर मंगळवारी पहाटे अचानक क्लोरिन वायूची गळती झाली. तेथील पाच कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास झाला. त्यांना उपचारासाठी परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेनंतर भिवंडी महापालिका पालिकेने परिसर बंद केला असून परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कचे आवाहन केले आहे.
टेमघर येथे स्टेम प्राधिकरणाचे पाणी पुरवठा केंद्र आहे. या प्रकल्पाद्वारे भिवंडी, ठाणे आणि मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रात संयुक्तिक पाणी पुरवठा केला जातो. मंगळवारी मध्यरात्री १२. १५ वाजताच्या सुमारास जल शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेल्या क्लोरिन वायूची गळती होऊ लागली. येथील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वायू गळतीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु वायू गळती मोठ्याप्रमाणात झाल्याने त्यांना श्वसनाचा आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला.
या घटनेची माहिती भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर महापालिकेची पथके, अधिकारी, शांतीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर बंद केला. तसेच परिसरातील रहिवाशांना सर्तकतेचे आवाहन केले.
बाधित कर्मचाऱ्यांना परिसरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील तीन कर्मचाऱ्यांना उपचार करुन सोडून देण्यात आले असून उर्वरित दोघांवर उपचार सुरु आहेत. कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.