लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : मागील वर्षभर नोकरीवर जाणाऱ्या एका तरूणीचा पाठलाग करणाऱ्या एका इसमाला तरूणीने ओरडा करताच नागरिकांनी रस्त्यावर पकडले. त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. विष्णुनगर पोलिसांनी संबंधित नोकरदार तरूणीच्या तक्रारीवरून इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की नोकरदार तरूणी आपले आई, वडिल आणि कुटुंबीयांसह महात्मा फुले रस्ता भागातील गायकवाडवाडी भागात राहते. ही तरूणी डोंबिवलीत नोकरी करते. सकाळी ती रिक्षेतून कामाच्या ठिकाणी जाते. कामावरून सुटल्यावर पुन्हा रिक्षेतून घरी येते. मागील वर्षभराच्या कालावधीत तरूणी कार्यालयात जायला निघाली की एक इसम दुचाकीवरून येऊन या तरूणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. या तरूणीला या तरूणाची भीती वाटायची. सतत हे प्रकार घडू लागल्याने तरूणीने घडत असलेला प्रकार आई, वडिलांना सांगितला.

आणखी वाचा-पर्यावरण परिणाम मूल्यांकनाशिवाय खारघर-तुर्भे बोगदा; खारघर डोंगररांगावरील निसर्गसंपदेची हानी होण्याची भीती

तरूणीने अनेक वेळा पाठलाग करणाऱ्या या तरूणाला आपल्या वाट्याला जाऊ नकोस. मला आपल्याशी कोणत्याही प्रकारचा संंवाद करायचा नाही, अशी तंबी दिली होती. तरीही तरूण ऐकत नसल्याने एक दिवस तरूणीने वडिलांना सोबत ठेवले आणि ती कामावर निघाली. नेहमीप्रमाणे तरूण पुन्हा तरूणीचा पाठलाग करत आला. त्यावेळी तक्रारदार तरूणीच्या वडिलांनी त्या तरूणाला रोखून आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारचा आपण त्रास देऊ नये. तिचा पाठलाग करायचा नाही. हा प्रकार सुरू राहिला तर मात्र आम्ही तुझ्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू, असे सांगितले.

या प्रकारानंतर काही दिवस तरूण तरूणीचा पाठलाग करणे थांबला होता. अलीकडे पुन्हा संबंधित तरूण तरूणीचा पाठलाग करून तिला रोखून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तरूणी त्याला झिडकारत होती. मंगळवारी तरूणी कामावरून सुटल्यावर घरी जाण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर रिक्षेची वाट पाहत होती. त्यावेळीही संबंधित तरूण पुन्हा तरूणीजवळ दुचाकीवरून आला. हा तरूण आपल्याशी काही गैरकृत्य किंवा जिवाला काही दुखापत करण्याची भीती तरूणीला वाटू लागली. तरूण तरूणीजवळून दूर होत नव्हता. यावेळी तरूणीने मोठ्या ओरडा करून दुचाकीवरील तरूण आपणास त्रास देत आहे असे सांगितले. पादचाऱ्यांनी त्या तरूणीला त्रास का देतोस, असे प्रश्न करत त्याला भर रस्त्यात चोप दिला. घनश्याम गुप्ते छेद रस्त्यावर हा प्रकार घडला.

आणखी वाचा-टपाल कार्यालयांच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त; आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार तरूणीने वडिलांना सांगितला. त्यानंतर या तरूणाविरुध्द तरुणीच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महात्मा फुले रोड परिसरात मागील अनेक वर्षापासून काही टवाळखोर, गुंडांची दहशत आहे. याच भागातील एका माँटी भाईला पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकारांना मारहाण प्रकरणी रस्त्यावर झोडपून काढले होते. याच भागातील हा इसम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.