अवघ्या काही सेकंदात लस नोंदणी बंद, इंटरनेट, नेटवर्कअभावी ग्रामस्थ हैराण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर : शहरी भागात १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी होत असल्याने शहरी भागातल्या नागरिकांनी ग्रामीण भागाकडे धाव घेतल्याचे सोमवारी समोर आले होते. त्यामुळे स्थानिकांनी केंद्रावर गोंधळ घातला होता. मात्र त्यानंतरही ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर शहरी नागरिकांचा ओघ सुरू असल्याचेच समोर आले आहे. तर ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र नोंदणीसाठी संकेतस्थळावर खुले होताच अवघ्या काही सेकंदात जागा संपत असल्याने लसीकरणासाठी प्रयत्न करणारे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. कमकुवत इंटरनेट आणि नेटवर्कअभावी नोंदणी होत नसल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे काही लशी ऑफलाइन पद्धतीनेही ठेवण्याची मागणी वाढते आहे.

देशभरात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची मोहीम १ मे रोजी सुरू झाली असली तरी राज्यात लशींच्या उपलब्धतेनुसार ३ मे रोजी प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले. शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर गर्दी झाल्याने नागरिकांनी लसीकरणासाठी ग्रामीण भागाचा पर्याय निवडला. त्यामुळे सोमवारी ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यातील धसई, शिवळे, शहापूर तालुक्यातील शेंद्रुण, वाशिंद या केंद्रांवर मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. स्थानिकांना लस न देता शहरातल्या नागरिकांना लस देण्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे काही ठिकाणी लसीकरण उशिराने सुरू झाले. मात्र या गोंधळानंतरही बुधवारी लसीकरण केंद्रांवर शहरी नागरिकांचा ओघ कायम असल्याचे दिसून आले. बुधवारी शहापूर तालुक्यातील शेंद्रुण येथील केंद्रावर शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे येथे काही काळ गोंधळाची स्थिती होती. स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य दिल्यानंतर लसीकरण सुरू झाले. मात्र लसीकरणाच्या नोंदणीतून स्थानिकांना सूट मिळावी अशी मागणी आता वाढते आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात लसीकरणाच्या नोंदणीसाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण वाढवण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामस्थांसाठी काही लशी आरक्षित ठेवण्याची मागणी होते आहे.

नोंदणीसाठी ऑफलाइनचा पर्याय ठेवण्याची मागणी

कोविन संकेतस्थळ, आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे ही नोंदणी करता येते. यावर आधार कार्डची माहिती भरल्यास कोणत्या ठिकाणी किती लशी उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या लशी खुल्या होताच अवघ्या काही सेकंदात संपत असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क, इंटरनेटची कमी उपलब्धता यामुळे अनेकदा नोंदणी करत असतानाच लशी संपतात. त्यामुळे इच्छा असूनही लस घेऊ  शकत नाही, अशी प्रतिक्रिया गृहिणी असलेल्या धनश्री सुजय अस्वले यांनी दिली आहे. यावर ऑफलाइनचा पर्याय ठेवण्याचाही मागणी त्यांनी केली आहे. अनेकदा नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत मात्र मोबाईलवर एसएमएस येत नसल्याने नोंदणी करणारे केंद्रावर गर्दी करतात. एसएमएस नसल्याने त्यांना लस मिळत नाही. त्यामुळे गोंधळ वाढतोय असेच सुरू राहिल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना लस दुरापास्त होईल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक  असल्याने नोंदणी असणाऱ्यांनाच नियमानुसार लस दिली जाते आहे. शासनाच्या आदेशानुसार तालुक्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

तारुलता धानके, तालुका आरोग्य अधिकारी, शहापूर

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens from urban areas rushing to rural areas for vaccination zws
First published on: 06-05-2021 at 00:36 IST