कार्यालयात जाता-येता रोपांना पाणी घालण्याचा दिनक्रम
पर्यावरण दिनानिमित्ताने पाच लाख झाडांचे वृक्षारोपणाचा संकल्प करणाऱ्या ठाणे महापालिकेने शहरात वृक्षारोपण केले खरे, मात्र त्यानंतर या झाडांकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने अनेक भागांतील झाडांची रोपे मरणासन्न अवस्थेत पोहचली आहेत. एक ते दोन दिवसांनी झाडांना होणारा टँकरचा पाणीपुरवठा आता पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे झाडांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन ठाण्यातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सकाळच्या वेळी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी कार्यालयात जाण्याअगोदर ही मंडळी पूर्वद्रुतगती महामार्गाच्या अजूबाजूच्या सेवा रस्त्यांवर दाखल होऊन तेथील झाडांना पाणी देतात. तीनहात नाका ते नितीन कंपनीपर्यंतच्या झाडे जगविण्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेणाऱ्या ठाणेकरांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, या उपक्रमात अधिकाधिक रहिवाशांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे.
ठाण्यातील विकास कॉम्प्लेक्स परिसरात रहाणारे अनिल जैन भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर येथे कार्यरत आहते. ठाणे शहरात फिरत असताना शहरातील वृक्षारोपण झालेल्या झाडांची होत असलेली दुर्दशा त्यांच्या लक्षात आली. त्यांनी ही गोष्ट आपल्या आजूबाजूच्या मित्रांना सांगितली. त्यानंतर जैन आणि त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेऊन या झाडांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. एप्रिल महिन्यापासून प्रत्येक दिवशी ही मंडळी कार्यालयात जाण्याआगोदर या परिसरात येऊन सोबत आणलेल्या बाटलीतून या झाडांना पाणी घालतात. या परिसरात एक सार्वजनिक नळ असल्याने तेथून ६० ते १०० झाडांना दररोज ही मंडळी पाणी देते. त्यानंतर ठाणे स्थानकातून कार्यालय गाठतात. या मंडळींचा हा दिनक्रम लक्षात आल्यानंतर येथील काही विक्रेतेही त्यांच्यासोबत झाडांना पाणी देऊ लागले आहेत. यश जैन, संतोष माने, विनय रक्षे असा १० ते १२ जणांचा हा गट असून त्यांचे काम अविरतपणे सुरू असते. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना जोडून परिसरातील वृक्षारोपण झालेल्या नव्या झाडांना पाणीपुरवठा करावा, असे आवाहन या ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृक्षारोपणाचे केवळ सोपस्कर..
ठाणे महापालिकेने सुमारे पाच लाख झाडे लावण्याचा संकल्प केला असून वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने त्याची अंमलबजावणी सुरू आहे. महापालिकेने ३० ते ४० हजार वृक्षारोपणाचा दावा केला असला तरी त्याच्या सुरक्षेची आणि संगोपनाची जबाबदारी मात्र निश्चित केली नसल्याने त्याचा फटका येथील झाडांना बसत आहे. वृक्षारोपण केल्यानंतर या रोपांच्या आजूबाजूला लावण्यात आलेली संरक्षण जाळी केवळ झाडाच्या आधारावर टेकवून ठेवल्याने अशा जाळ्या तेथून चोरून नेण्यात आल्या आहे. तर काही जाळ्या झाडांवर पडल्याने झाडे नष्ट होऊ लागली आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens initiative to save trees
First published on: 17-05-2016 at 04:36 IST