कल्याण- कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या बहुतांशी ठेकेदारांचे डांबर प्रकल्प बंद आहेत. पाऊस सुरू झाल्या शिवाय हे प्रकल्प सुरू करण्यात येणार नसल्याने शहरातील नागरिकांना अद्याप महिनाभर खड्डे, धूळ भरल्या रस्त्यावरुन प्रवास करावा लागणार आहे.कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सर्वच डांबरी रस्त्यांची डांबर निघाल्याने चाळण झाली आहे. मागील तीन महिन्याच्या कालावधीत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी, माती, सिमेंटचा गिलावा मागील महिन्यापासून पाऊस नसल्याने कोरडा होऊन हवेत उडत आहे. बारीक खडी सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर पसरली आहे.

संध्याकाळी पाच नंतर वाऱ्याचा जोर असल्याने दुर्दशा झालेल्या रस्त्यावरुन वाहने धावत असताना धुळीचा उधळा हवेत उडतो. या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या सोयाट्यांमधील रहिवासी, दुचाकी स्वार या धुळीने हैराण आहेत. काचा उघड्या ठेऊन प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहन चालक, प्रवाशांना या धुळीचा त्रास होत आहे.पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे करण्यासाठी पालिकेने जूनमध्ये ठेकेदार नेमले. १२ कोटी रुपये या कामांसाठी प्रस्तावित आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची चाळण केली आहे. मुसळधार पावसामुळे ठेकेदारांनी खडी, माती, सिमेंटचा गिलावा भरुन तात्पुरत्या स्वरुपात खड्डे भरले आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील पाटकर रस्त्यावरील स्कायवॉकखाली दुचाकींचा बेकायदा वाहनतळ

आता महिनाभरापासून पाऊस गायब आहे. गणेशोत्सव जवळ येतोय. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. परंतु, रस्ते देखभाल करणाऱ्या ठेकेदारांचे डांबर प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवले जातात. त्यामुळे रस्त्यावर टाकण्यासाठी ठेकेदारांकडे सध्या डांबर उपलब्ध नाही. बहुतांशी डांबर प्रकल्प नवी मुंबई भागात आहेत. हे प्रकल्प पावसाळ्यात सुरू ठेवले तर तेथील सयंत्र बिघडतात आणि आवश्यक त्या गुणवत्तेत डांबर उपलब्ध होत नाही. त्यामुळे ठेकेदार डांबर प्रकल्प बंद ठेवणे पसंत करतात, असे एका माहितगाराने सांगितले.

हेही वाचा >>>डोंबिवलीत वाढदिवसाच्या दिवशी वडिलांची पत्नी, मुलांना मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण डोंबिवली पालिका ह्द्दीत रस्ते देखभालीची कामे करणाऱ्या बहुतांशी ठेकेदारांचे डांबर प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे पाऊस जाऊनही ठेकेदारांनी शहरातील रस्ते सुस्थितीत करण्याची कामे अद्याप हाती घेतली नसल्याचे समजते. आता हे ठेकेदार पालिकेकडून कानउघडणी झाली की मोठ्या ठेकेदारांकडून उसनवारीकरुन डांबर आणून रस्त्यावर ओतण्याचे काम करतात, असे समजते. पालिकेच्या बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पावसाळ्यात ठेकेदारांचे डांबर प्रकल्प बंद असतात. आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ते सुरू होतील. शहरातील रस्ते सुस्थितीत करण्याची कामे लवकरच हाती घेतली जातील.