ठाणे : ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच असलेल्या शहरातील मुख्य बाजारपेठेत गणेशोत्सवाचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी शुक्रवारपासून गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी बाजारात नागरिकांची गर्दी वाढली होती. यामुळे स्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या आणि रिक्षांच्या वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली. कोंडीमुळे पंधरा मिनीटांच्या अंतरासाठी दिड ते दोन लागत असल्याने नोकरदार वर्ग हैराण झाला होता.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ आहे. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच ही बाजारपेठ आहे. ठाणे स्थानक ते जांभळी नाक्यापर्यंत ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठ कपडे, दागिने, साहित्य विक्रीच्या आस्थापना आहेत. याशिवाय, या बाजारपेठेत सण-उत्सवानुसार फेरिवाले विविध साहित्य विक्रीसाठी येतात. या बाजारपेठ हार, फुलेही विक्रीसाठी ठेवण्यात येतात. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात खरेदीसाठी नागरिक येथे मोठी गर्दी करतात. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठीही येथे नागरिक मोठी गर्दी करतात. यंदाही हे चित्र कायम आहे. गणेशोत्सवाच्या आरासाकरिता लागणारे साहित्य बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.

खरीखुरी वाटणाऱ्या फुलांची आरास करण्यासाठी विविध कापडी तसेच प्लास्टिकची फुले आणि त्यासाठी लोखंडी सांगाडा विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यास नागरिक पसंती देताना दिसत आहेत. कापडी तसेच प्लास्टिकची फुलांचे पट्टे १००० ते १२०० रुपयांना तर, लोखंडी सांगाडे १२०० पासून पुढे विक्री केले जात आहे. याशिवाय, गणपत्ती पुजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे.

ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या कोर्टनाका येथून बाजारपेठेतील मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करतात. परंतु गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेतील गर्दीमुळे बसगाड्यांचा वेग मंदावला असून येथील कोंडीत बसगाड्या अडकून पडत आहेत. त्याचा परिणाम, बाजरपेठेला जोडणाऱ्या जांभळीनाका, तलावपाळी, राममारुती रोड, गोखले रोड या अंतर्गत मार्गांना बसत आहे. या मार्गांवर रिक्षांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.

या रिक्षा कोंडीत अडकून पडल्या होत्या. गर्दीमुळे टिएमटी बसगाड्या सॅटीस पुलावरील थांब्यावर उशीराने पोहचत असून यामुळे थांब्यांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. तसेच सॅटीस पुलावरून जांभळी नाक्या दिशेने जाणाऱ्या बसगाड्या कोंडीत अडकत आहेत. शनिवारी सायंकाळी हेच चित्र होते. या कोंडीमुळे पंधरा मिनीटांच्या अंतरासाठी दिड ते दोन लागत असल्याने नोकरदार वर्ग हैराण झाला आहे.