डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा भागातील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी या सुमारे ५०० मीटर लांबीच्या सीमेंट काँक्रीट रस्त्याच्या रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षीपासून एमएमआरडीएच्या निधीतून सुरू आहे. आता आठ महिने होऊन गेले तरी या रस्त्याच्या कामात कोणतीही प्रगती नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
श्रीधर म्हात्रे चौक ते प्रकाश प्रतिमा, अष्टगंध सोसायटीपर्यंतचा रस्ता सखल भागात आहे. थोडा पाऊस पडला तरी हा रस्ता नेहमीच पाण्याखाली जातो. रस्ता ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजुला एक ते दीड फुटाची उंच गटारे बांधण्यास सुरूवात केली आहे. परंतु, रस्त्याच्या मधील भागात भराव, काँक्रिटीकरणाचे कोणतेही काम हाती घेतले नाही. मुसळधार पाऊस पडला तर या भागात गुडघाभर पाणी साचून ते श्रीधर म्हात्रे चौक ते संत तुकाराम मार्गापर्यंत तुंबून राहील अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
गेल्या वर्षी या रस्त्याचे रुंदीकरण न करताच ठेकेदाराने काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले होते. रुंदीकरण केल्याशिवाय हे काम करू नये, अशी भूमिका घेत गरीबाचापाडा उत्कर्ष समिती, परिसरातील नागरिकांनी ॲड. गणेश पाटील यांच्या पुढाकारातून उच्च न्यायालयात जाण्याची, आंदोलनाची तयारी केली होती. त्यामुळे ठेकेदाराने हे काम थांबविले होते. पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या रस्त्यावरील अतिक्रमणे तोडली. तरीही एका लोकप्रतिनिधीने केलेल्या विरोधामुळे पालिकेला अनमोलनगरीपर्यंत रुंदीकरणातील बांधकामे तोडता आली नाहीत. श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. तरी ठेकेदार हे रस्ते काम अतिशय संथगतीने करत असल्याने हे काम १५ जूनपूर्वी पूर्ण होणार नसेल तर या रस्त्याचे तात्पुरते डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत करण्यात यावा, अशी मागणी गरीबाचापाडा उत्कर्ष समितीचे अध्यक्ष विवेकानंद धवसे यांनी एमएमआरडीए आणि पालिकेकडे केली आहे. या रस्त्याचे काम रखडले असल्याने सकाळ, संध्याकाळ या रस्त्यावर अवजड वाहने आली की कोंडी होते. या भागात खोदून ठेवलेल्या गटारासाठीच्या खड्ड्यात कोणी पादचारी, लहान मूल पडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
श्रीधर म्हात्रे चौक रस्ता मार्गात काही झाडे आहेत. ती तोडण्यासाठी रस्ते ठेकेदाराने अद्याप पालिकेच्या उद्यान विभागाकडे आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यामुळे हे काम रखडले आहे. उद्यान विभागाने कागदपत्रे आली की तात्काळ मंजुरीची कार्यवाहीची तयारी ठेवली आहे. ठेकेदाराला हे काम वेळेत पूर्ण करण्यास सांगितले आहे. राजेश सावंत– साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग. डोंबिवली.
जून अखेरपर्यंत श्रीधर म्हात्रे चौक सीमेंट रस्ता पूर्ण झाला नाहीतर या रस्त्यावरून धावणाऱ्या बस, अवजड वाहने, रिक्षा, मोटारी यांच्यामुळे हा रस्ता दररोज वाहतूक कोंडीत अडकेल. हा रस्ता सखल असल्याने थोड्या पावसात येथे पाणी तुंबते. आयुक्तांनी या महत्वपूर्ण रस्ते कामात लक्ष घालावे.
मनोज वैद्य- रहिवासी.