ठाणे – पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयंपुनर्विकासासंबंधीची माहिती नागरिकांना ‘ऑन दि स्पॉट’ मिळवता येणार आहे. या करिता ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या सहकारातून समृद्धी या उपक्रमांतर्गत स्वयंपुनर्विकासाची माहिती देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील मो ह विद्यालयाच्या सभागृहात शनिवारी, १२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
यंदा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्यानिमित्ताने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्यावतीने ‘सहकारातून समृद्धीकडे’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून त्यात स्वयंपूनर्विकाससंबंधीची माहिती ‘ऑन दि स्पॉट’ ही कार्यशाळा होणार आहे. स्वयंपूनर्विकास प्रक्रिया सोपी आणि गतिशील व्हावी हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये स्वयंपूनर्विकासाची प्रक्रिया, त्यासाठी लागणाऱ्या कर्जासंबंधी माहिती, कर्जाची मर्यादा, शासनाकडून व्याजामध्ये मिळणाऱ्या सवलती याबाबतची माहिती ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ज्ञ अधिकारी देणार आहेत.
तसेच, ठाणे महापालिकेच्यावतीने इमारतीचे आराखडे मंजूर करताना कोणती काळजी घ्यावी आणि एक खिडकी योजनेबाबतही माहिती दिली जाणार आहे. तर, इमारतीचे नकाशे मंजूर करताना मिळणारे चटईक्षेत्र (एफएसआय) आणि इतर बाबीविषयी वास्तु विशारद सचिन साळवी हे मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर स्वयंपूनर्विकासाची प्रक्रिया, त्यात उद्भवणाऱ्या अडचणी या संदर्भातील माहिती सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी, सभासदांना दिली जाणार आहे. या कार्यक्रमास पुनर्विकास तसेच स्वयंपूनर्विकास करणाऱ्या सर्व गृहनिर्माण सोसायटीच्या सभासद, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन फेडरेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे गटनेते, स्वयंपूनर्विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर हेही मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत आमदार संजय केळकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.
ठाणे शहराचा वेगाने विकास होत आहे. जुन्या ठाण्यातील शेकडो इमारती ४० वर्षांहून अधिक काळ जुन्या आहेत. या इमारतींना पुनर्विकासाची प्रतीक्षा आहे. मात्र, सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना आर्थिक मर्यादा येत असल्यामुळे, इमारतीच्या पुनर्विकास नाईलाजाने बांधकाम व्यावसायिकांकडे सोपवावा लागतो. त्यात अनेकदा प्रकल्प रखडण्याबरोबरच अनंत अडचणी येतात. यासाठी स्वयंपुनर्विकास रहिवाशांसाठी वरदान ठरणार आहे.- सीताराम राणे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन