कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर मुसळधार पावसामुळे खड्डे पडले आहेत. खड्डे पाऊस सुरू असताना, नसताना तातडीने बुजविण्याचे आदेश ठेकेदारांना प्रशासनाने दिले आहेत. या कामात हलगर्जीपणा करुन खड्ड्यांमुळे काही दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी ठेकेदार आणि त्या रस्त्याशी संबंधित अभियंता जबाबदार धरला जाईल. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा गुरुवारी कल्याण डोंबिवली पालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिला.
पालिका हद्दीतील खड्ड्यांमुळे प्रशासनातील अधिकारी नागरिकांकडून टिकेचे लक्ष्य होत आहेत. शहरातील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदार, त्यांच्यावर नियंत्रक अभियंते नेमले आहेत. तरीही खड्डे बुजविण्याची कामे प्राधान्याने केली जात नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. खड्ड्यांमुळे शहरात वाहन कोंडी होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजविण्याची कामे हाती घेतली आहेत. यामुळे पालिकेचे ठेकेदार करतात काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>ठाणे: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी देणार घरोघरी भेटी, मतदार यादी पुनरिक्षणाअंतर्गत २१ जुलैपासून
शहर अभियंता अहिरे यांनी गुरुवारी सकाळी कल्याण मधील खड्डे पडलेल्या दुर्गाडी किल्ला परिसर, गोविंदवाडी, पत्रीपूल, उंबर्डे, सहजानंद चौक, म्हसोबा चौक, ठाकुर्ली, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर, टिळक चौक, मानपाडा रस्ता परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. त्यांच्या सोबत कल्याण विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता मंगेश सांगळे उपस्थित होते.
हेही वाचा >>>डोंबिवलीत बँकेतून बाहेर पडताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले
रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अशा खड्ड्यात दुचाकी, इतर वाहन आपटून अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज घेऊन पालिका हद्दीतील एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, अशा पध्दतीने ठेकेदारांनी खड्डे बुजविण्याची कामे सुरू ठेवायची आहेत. कोणतेही कारण यासाठी मान्य केले जाणार नाही. खड्ड्यांमुळे काही दुर्घटना घडली तर ठेकेदार आणि त्या रस्त्याशी संबंधित अभियंत्याला जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अहिरे यांनी दिला.
तात्काळ खड्डे बुजविणाऱ्या क्विक सेटिंग सिमेंट तंत्राचा वापर खड्डे बुजविण्यासाठी करण्याच्या सूचना अहिरे यांनी केल्या. दिवसा खड्डे भरताना वाहनांचे अडथळे येत असल्याने ठेकेदार, अभियंत्यांनी रात्री ते पहाटेच्या वेळेत ही कामे करावीत, असेही अहिरे यांनी सुचविले.