कल्याण – कल्याण पूर्व काटेमानिवली भागातील पालिकेच्या ड प्रभाग कार्यालया जवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञान केंद्राजवळील बेकायदा बांधकाम पालिकेच्या ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींप्रमाणे जमीनदोस्त केले.

मागील तीन वर्षाच्या कालावधीत कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून कल्याण पूर्वेत २१ कोटी रूपये खर्च करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञान केंद्र उभारण्यात आले. जिल्ह्यातील सर्वात अद्ययावत असे हे स्मारक आहे. राज्याच्या विविध भागातील नागरिक, आंबेडकरीप्रेमी या स्मारकाच्या पाहणीसाठी येतात. स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण अबाधित राहावे म्हणून प्रशासन काळजी घेत आहे.

काही महिन्यापूर्वी डाॅ. आंबेडकर स्मारका शेजारील एक मोकळ्या जागेत एक निवारा उभा राहिला. त्यानंतर हळूहळू तो निवारा भक्कम करण्यात आला. तेथील निवाऱ्याला दरवाजा तयार करून त्याला कुलूप लावण्यात आले. सकाळी चालणाऱ्यांचा कट्टा असा फलक तेथे झळकू लागला. सुशोभित करण्यात आलेल्या डाॅ. आंबेडकर स्मारकाच्या शेजारील हे बांधकाम पक्के केले जात आहे याची जाणीव झाल्यावर या भागातील सामाजिक कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयात तक्रार केली. हे बेकायदा बांधकाम तोडून टाकण्याची मागणी केली.

या बेकायदा बांधकामाविषयी तक्रारी वाढू लागल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांवर काही राजकीय मंडळी दबाव टाकून हे बेकायदा बांधकाम तोडून टाकू नये म्हणून दबाव टाकू लागली. तिवारी यांच्या नंतर इतर सात नागरिकांनीही हे बेकायदा बांधकाम तोडून टाकावे अन्यथा या बांधकामाच्या शेजारी टपऱ्या, हातगाड्या सुरू होऊ हा परिसर पुन्हा बकाल केला जाईल, अशी भीती व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मारकाच्या शेजारील बेकायदा बांधकामाची पाहणी केल्यानंतर ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी हे बेकायदा बांधकाम करणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावली. या निवाऱ्याच्या ठिकाणी नोटीस चिकटवण्यात आली. हे बेकायदा बांधकाम स्वताहून काढून टाकण्याचे बजावण्यात आले. नोटीस देऊनही बांधकामधारक बांधकाम काढून घेत नसल्याने साहाय्यक आयुक्त यमगर यांनी दोन दिवसापूर्वी तोडकाम पथक घेऊन वरिष्ठांच्या आदेशावरून स्मारका शेजारील बेकायदा बांधकाम भुईसपाट केले. या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

हे बेकायदा बांधकाम वाचविण्यासाठी काही मंडळी दादर येथील आंबेडकर भवनपर्यंत पोहचली होती. तेथूनही तक्रारदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.