कल्याण – डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील माणकोली उड्डाण पुलाजवळील स्वामी नारायण लाईफस्पेस व्यापारी संकुल असलेल्या भागाला पालिकेच्या ह प्रभागातील मालमत्ता कर आकारणी विभागातील वरिष्ठ लिपिक नंदकिशोर राणे यांनी दोन वर्ष कर आकारणीस टाळाटाळ केली. पालिकेचा लाखो रूपयांचा महसूल बुडविला म्हणून आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुवारी राणे यांना तडकाफडकी निलंबित केले.
अशाच प्रकारची कारवाई आयुक्त गोयल यांनी आता पालिकेच्या दहा प्रभागांमधील मालमत्ता कर विभागात सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मालमत्ता कर लावण्यासाठी दाखल केलेली नागरिक, विकासक यांची प्रकरणे प्रभागातील मालमत्ता कर विभागातील कर्मचारी तयार करून दाबून ठेवतात. मग ती नस्ती गहाळ झाली. त्या कर आकारणीच्या नस्तीमध्ये किरकोळ त्रृटी काढून विकासक, नागरिकांना हैराण करतात, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
मालमत्ता कर विभागाचा पदभार मागील दोन वर्ष उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्याकडे होता. त्यांनी मुख्यालयासह, प्रभागातील मालमत्ता कर आकारणीवर बारकाईने नजर ठेवली होती. कोणत्याही प्रकारची नियमबाह्य मालमत्ता कर आकारणीची नस्ती मंजूर होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली होती. उपायुक्त देशपांडे यांनी बदली झाल्यानंतर त्यांच्या बदलीवर टपून बसलेले मुख्यालय आणि प्रभागातील मालमत्ता कर विभागातील अधीक्षक, लिपिक आता मोकाट सुटले आहेत.
प्रभागात मालमत्ता कर लावण्यासाठी एखाद्याने नागरिकाने प्रकरण दाखल केले की त्याच्याकडे सुमारे सहा ते सात हजार रूपयांची मागणी लिपिकांकडून केली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत.
मालमत्ता कर विभागाच्या विद्यमान उपायुक्त कांचन गायकवाड यांनी उपायुक्त देशपांडे यांच्या कार्यकाळाप्रमाणे या विभागावर बारकाईने अंकुश ठेवण्याची मागणी नागरिक करत आहेत. डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील मोठागाव येथील स्वामी नारायण लाईफस्पेस संकुलातील अ, ब, क आणि ड पाख्यांना (विंग) पालिकेच्या नगररचना विभागाने एप्रिल २०२३ मध्ये बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आहे. या संकुलातील ड विभागातील अनिवासी भागाला मागील दोन वर्षाच्या कालावधीत ह प्रभागातील कर विभागातील वरिष्ठ लिपिक नंदकिशोर राणे यांनी कर आकारणी केली नव्हती. यामुळे पालिकेचे लाखो रूपयांचे कराच्या माध्यमातून नुकसान होत होते.
मालमत्ता कर हा पालिकेचा मुख्य महसुली उत्पन्न स्त्रोत आहे. अभिनव गोयल बुधवारी दुपारी ह प्रभाग कार्यालयात आले. त्यांनी मालमत्ता कर विभागातील कर वसुलीचा आढावा घेतला. त्यांना स्वामी नारायण सिटीतील लाईफस्पेस संकुलातील ड पाख्यातील (विंग) अनिवासी भागाला मालमत्ता कर आकारणी केली नसल्याचे आढळले. याविषयी आयुक्तांनी नंदकिशोर राणे यांना विचारणा केल्यावर ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. आयुक्तांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.
मागील १५ वर्षाहून अधिक काळ राणे हे ह प्रभागात मालमत्ता कर विभागात आहेत. त्यांची टिटवाळा अ प्रभागात बदली झाली होती. ते राजकीय वजन वापरून पुन्हा बेकायदा बांधकामांचे आगर असलेल्या ह प्रभागात रूजू झाले होते. लाईफस्पेस संकुलाच्या अभियंत्याने घेतलेली गाळ्यांची मोजमापे आणि पालिकेची मोजमापे मिळतीजुळती नव्हती. ही मापे जुळती करावीत म्हणून राणे प्रयत्नशील होते. त्यांना कोणाची साथ मिळत नव्हती.