कल्याण : कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा चौक येथील काटई निळजे रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाच्या कामाचे मुंबईतील वीर जिजामाता टेक्नाॅलाॅजी इन्स्टिट्युटच्या (व्हीजेटीआय) तज्ज्ञांनी परीक्षण करून सविस्तर अहवाल लवकरात लवकर शासनाकडे दाखल करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता यांना दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलावरील कामाचे परीक्षण होणार असल्याने या पुलाचा ठेकेदार, या पुलाच्या ठेकेदाराचे राजकीय पाठीराखे यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. पलावा चौकातील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे, घाईने उरकण्यात आले आहे. या निकृष्ट कामामुळे या पुलावरून दररोज जाणाऱ्या प्रवाशांना धोका होऊ शकतो. त्यामुळे या पुलाच्या कामाच्या दर्जाचे परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार व मनसेचे नेते राजू पाटील गेल्या वर्षापासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, गुणवत्ता विभाग यांच्याकडे करत होते.

या पुलाच्या पाठीमागे काही राजकीय विकासपुरूष असल्याने शासनाने गेल्या दीड वर्षात राजू पाटील यांच्या पत्रांची दखल घेतली नाही. कर्जत, बदलापूर, भिवंडी, नाशिक, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अलिबाग, पनवेल आणि कोकणाला जोडणारा कल्याण शीळ रस्ता हा मधला महत्वपूर्ण मार्ग आहे. हजारो वाहने दररोज या रस्त्यावरून धावतात. या रस्त्यावरील पलावा चौक भागातील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून पलावा चौकाजवळ देसाई काटई निळजे रेल्वे मार्गावर एक्सपेरिया माॅल शेजारी तिसऱ्या उड्डाण पुलाची मागणी प्रवासी, मनसे नेते राजू पाटील यांच्याकडून शासनाकडे करण्यात येत होती.

या सततच्या मागणीमुळे २०१९ मध्ये काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला शासनाची मंजुरी मिळाली. अतिशय संथगतीने आणि निकृष्ट पध्दतीने हे काम करण्यात आले, सात वर्षाच्या कालावधीत गुणवत्तापूर्ण पध्दतीने पुलाचे काम पूर्ण झाले नाही. या पुलाच्या कामावविषयी अनेक तक्रारी आपण नियंत्रक एमएसआरडीसीकडे केल्या. संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पुलाची पाहणी करून पुलाच्या कामातील अनेक त्रृटी वेळोवेळी उघड केल्या. अधिकारी आणि ठेकेदारांनी हेतुपुरस्सर या पुलाच्या गुणवत्तापूर्ण कामाकडे दुर्लक्ष केले, असे राजू पाटील यांनी सांगितले.

पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना ४ जुलै रोजी शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी घाईने या पुलाचे उद्घाटन करून पूल वाहतुकीसाठी खुला केला. योग्य नियोजनातून पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पुलावर आता खड्डे, बारीक खडी पसरली आहे. या पुलाच्या कामाची चौकशी आणि बांधकाम तज्ज्ञांकडून या पुुलाच्या कामाचे परीक्षण आवश्यक असल्याची मागणी राजू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या पत्राची दखल शासनस्तरावरून घेण्यात आली आहे. निळजे पुलावर खड्डे पडले असताना पूल कसा सुस्थितीत आहे, असे दावे शिंदे शिवसेनेकडून केले जात होते. शिंदे शिवसेनेला घेरण्याची ही निती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.