scorecardresearch

मुंबईत कामे झालेली नसल्याबाबत जनता त्यांना हिशोब विचारेल; मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे विधान

आम्हाला दाबून ठेवण्यात आले. पण, संधी आली आणि आम्ही चमत्कार करून दाखविला

मुंबईत कामे झालेली नसल्याबाबत जनता त्यांना हिशोब विचारेल; मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये जी कामे करायला पाहिजे होती, ती कामे गेल्या अनेक वर्षामध्ये का केली नाहीत, याचा हिशोब जनता त्यांना विचारेलच, असे सांगत राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. तसेच शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे चांगले गुण आहेत पण, त्यांना संधीच मिळाली नाही. माझ्याकडेही थोडेफार चांगले गुण आहेत. आम्हाला दाबून ठेवण्यात आले. पण, संधी आली आणि आम्ही चमत्कार करून दाखविला, असा टोलाही त्यांनी लगावला. 

हेही वाचा >>> ठाण्यात वाळूमाफियांविरोधात धडक कारवाई सत्र; दोन दिवसांच्या मोहिमेत लाखोंचा मुद्देमाल नष्ट

कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ शनिवारी ठाण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. या मेळाव्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून हे शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक फिरायला येतात. परंतु मुंबई शहरामध्ये जी कामे करायला पाहिजे होती, ती कामे गेल्या अनेेक वर्षामध्ये का केली नाहीत, याचा हिशोब जनता त्यांना विचारेलच, असे सांगत मुख्यंमत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. आमच्या सरकारला पाच ते सहा महिने झाले असून आमच्या सरकारने पुढच्या दोन वर्षात मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर विविध कामांचे भुमीपुजनही केले, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> ठाणे : सरकार प्रलोभन आणि दडपशाहीने काम करत आहे ; खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र आणि राज्यशासनावर टीका

आम्ही गुवाहाटीला असताना दिपक केसरकर यांनी चांगले काम केले. त्यांच्यात चांगले गुण आहेत. पण, त्यांना संधी मिळाली नाही. माझ्यातही थोडेफार गुण आहेत. पण, दाबून ठेवले तर गुण दिसणार कसे. गुण दिसण्यासाठी व्यासपीठ द्यायला हवे आणि त्याचबरोबर वाव द्यायला हवा. अनेकजण असे आहेत, त्यांच्यात चांगले गुण आहेत. संधी आली आणि या सर्वांनी चमत्कार करून दाखविला, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असायला हवा म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली. विनाअनुदानीत ६१ हजार शिक्षकांना ११६० कोटी रुपयांचे अनुदान मंजुर करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा देखील लवकरच मार्गी लावला जाईल असेही त्यांनी सांगितले. शिक्षक ही भावी पिढी घडवण्याचे काम करते. त्यामुळे भविष्यात शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना शिकविण्याचेच काम करावे, यावर सरकार विचार करत असल्याचेही ते म्हणाले. शिक्षक उमेदवार म्हात्रे यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी राहीली आहे. पण, कोणीही गाफील राहू नका, असा सल्ला देत त्यांनी ठाणे शहर मतदार संघात रविंद्र फाटक यांच्या झालेल्या पराभवाची आठवण करुन दिली.

अडीच वर्षात विकास थांबला होता

समृध्दी महामार्गामुळे पुढील सहा महिन्यात ठाणे ते शिर्डी हा प्रवास अवघ्या दिड ते पावणे दोन तासात होणार आहे. विरार ते वर्सोवा असा सी लिंक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विकासाची अनेक कामे हाती घेतली आहेत. मात्र मागील अडीच वर्षात हाच विकास थांबला होता. परंतु आम्ही वाटेतील अडथळे काढून टाकल्याने विकास वेगाने होत आहे. आता सर्वसामान्यांचे सरकार आले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच

शिवसेना आणि भाजप युतीबाबत उध्दव ठाकरे यांना मी सांगितले. पण, त्यांनी ऐकलेच नाही. त्यांनी नको तेच केले आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना जे नको होते, तेच केले. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, तिकडे खोटी शिवसेना आहे. त्यामुळे खऱ्याच्या मागे उभे रहा. आपल्याला ठाणे, मुंबई महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जिंकायच्या आहे. माझा पक्ष छोटा आहे, पण हाच पक्ष योग्य वेळी काटा काढण्याचे काम करतो, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मेळाव्यात बोलताना सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 20:27 IST

संबंधित बातम्या