उल्हासनगरः ठाणे जिल्ह्यातील कल्याण हा स्वतंत्र जिल्हा व्हावा ही आमची सुरूवातीपासूनची मागणी आहे. आता लवकरच जनगणना होणार आहे. त्यानंतर नक्कीच कल्याण हा जिल्हा होईल. तसा शब्द मला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे, अशी प्रतिक्रिया मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी आले होते. कल्याण जिल्हा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असेही कथोरे यावेळी म्हणाले.

कल्याण कृषी उत्त्पन्न बाजार समिती परिसरात रस्तयांची दुरावस्थआ झाली होती. येथे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांची मोठी वर्दळ असते. मात्र चांगल्या रस्त्यांअभावी सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे येथील रस्ता करण्याची मागणी होती. याच रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा सोमवारी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार कथोरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलचा विजय झाला. कथोरे यांनी यासाठी मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांच्याच हस्ते या रस्त्याचे भूमीपूजन संपन्न झाले.

येथे बोलताना आमदार किसन थोरे यांनी जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी व्यापारी यांची वर्दळ असते; मात्र येथे रस्त्यांची सुविधा नाही. सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. निवडणुकीच्या काळात येथे आलो होतो. व्यापाऱ्यांना त्या वेळी येथील रस्ते नीट करून देण्याचे आवाहन केले होते. येथे घाणीच्या साम्राज्यात व्यापाऱ्यांनी व्यवसाय करणे हे मला पटले नव्हते. त्यामुळे हे काम हाती घेतले, असे ते म्हणाले.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी कल्याण जिल्हा निर्मितीच्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. कल्याण जिल्हा व्हावा ही आमची मागणी आहे. जनगणनेनंतर जिल्हा निर्मितीला संधी आहे. मला तसा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे, असेही कथोरे यावेळी म्हणाले. प्रशासकीयदृष्टी कल्याण जिल्हा करून त्यात आसपासच्या तालुक्यांचा समावेश केल्यास त्याचा फायदा होईल, अशी भूमिका आमदार कथोरे गेल्या अनेक वर्षांपासून मांडत आहेत.

आधी युतीचाच पर्याय

केंद्रात आणि राज्यात आम्ही विविध पक्षांसोबत आहोत. त्यामुळे पालिका निवडणुकीतही आम्ही युतीच्याच मार्गावर चालू. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालू. मात्र स्थानिक पातळीवर काही मतभेद असल्यास निर्णय घेऊ, असेही कथोरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती श्रवींद्र घोडविंदे, उपसभापती जालिंदर पाटील, शिवसेनेचे अरविंद मोरे, सर्व संचालक, कर्मचारी, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.