ठाणे : ठाणे शहरातील बहुचर्चित समूह पुनर्विकास योजनेच्या भूमिपूजनासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण तसेच उद्घाटन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी ठाणे शहरात येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच ठाणे दौरा असल्यामुळे महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेनेही या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली आहे.
ठाणे शहरातील समूह पुनर्विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील किसननगर आणि हाजुरी परिसरात राबविण्यात येणार असून या कामाचा भूमिपूजन सोहळा महापालिकेकडून आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेतील अडथळे आणि आराखडय़ांना अंतिम मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू होती. दरम्यान मंगळवारी राज्य शासनाने आराखडय़ांना अंतिम मंजुरी दिल्यानंतर ही योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर तीन हात नाका परिसरात उभारण्यात आलेल्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते ठाणे ग्लोबल ई-उद्घाटन, कमांड आणि कंट्रोल सेंटर, स्मार्ट सिटीअंतर्गत कळवा-पारसिक, कोलशेत, वाघबीळ, बाळकुम-साकेत, कोपरी, शास्त्रीनगर, नागलाबंदर खाडीकिनारा विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आपला दवाखाना ई-शुभारंभ, घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती ई-शुभारंभ, बांधकाम आणि तोडफोड कचरा पुनप्र्रक्रिया केंद्राचे लोकार्पण, शहरी वनीकरण प्रकल्पाचे ई-भूमिपूजन, विज्ञान केंद्र प्रकल्पाचे ई-भूमिपूजन, बीएसयूपी सदनिकांचे वितरण, दिव्यांगांना सदनिका आणि स्टॉलचे वितरण तसेच इतर प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.