ऐन उन्हाळ्यात आवक घटल्याने दरांची उसळी
दक्षिण भारतातून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शहाळ्याची आवक गेल्या काही दिवसांपासून रोडवल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा प्रचंड वाढू लागल्यामुळे नागरिकांचा ओढा शहाळ्याचे पाणी पिण्याकडे वाढत असतानाच आवक कमी झाल्याने विक्रेत्यांनी शहाळ्याची किंमत चक्क १० ते १५ रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ५० रुपये नग या दराने शहाळ्याची विक्री केली जात आहे.
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश येथून नारळ विक्रीसाठी महाराष्ट्रात आणले जातात. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार कितीही नियंत्रण मुक्त करण्याची भाषा केली जात असली तरी अजूनही मोठय़ा प्रमाणावर बाजार समितीच्या नियंत्रणात नारळांची आवक होत असते. दक्षिणेतील विविध राज्यांतून येणारा नारळ मुंबईत दाखल होतो आणि तो पुढे नवी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसरात विक्रीसाठी नेला जातो. गेल्या काही दिवसांपासून केरळ, आंध्र प्रदेश या भागांतून मुंबईत होणाऱ्या नारळाची आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याची माहिती ठाणे येथील नारळ विक्रेते बाबू म्हात्रे यांनी दिली.
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश येथे प्रतिकूल हवामानामुळे यंदा नारळाचे पीक कमी आले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच नारळाचे दर वाढले आहेत, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली. गेल्या आठवडय़ात ३५ रुपयांना मिळणारे उत्तम प्रतीचे शहाळे या आठवडय़ात ५० रुपयांना विकले जाऊ लागले आहे. १०-१२ रुपयांना मिळणारे अगदी छोटे नारळ १७-१८ रुपयांना मिळत आहेत. २५ रुपयाला मिळणारे मध्यम आकाराचे नारळ ३०-३२ रुपयाला मिळत आहेत, तर ३५ रुपयाला मिळणारा मोठा नारळ ४३ रुपयांना मिळत आहे. येत्या काळात या दरांमध्येही वाढ होण्याची चिन्हे आहेत.
सध्या चेन्नई येथून येणारी शहाळी मुंबई, ठाण्यात मोठय़ा प्रमाणात दिसत आहेत. केरळ आणि आंध्र प्रदेश येथील शहाळ्यांचे कवच पातळ असते. कडक उन्हामुळे ही शहाळी तडकण्याची शक्यता असते. याउलट चेन्नई येथून येणारी शहाळी कडक असल्याने त्यांची आवक व्यवस्थित होत आहे. चेन्नईतून दररोज चार ते पाच ट्रक भरून माल येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परंतु सध्या तापमानात मोठी वाढ झाली असल्याने शहाळ्यांची मागणी वाढली आहे. आवक कमी आणि मागणी अधिक या व्यस्त प्रमाणामुळे किमतीत वाढ झाली आहे, असे नारळ विक्रेते रामकृष्ण चौबे यांनी सांगितले.
पाऊस कमी झाल्यामुळे या वर्षी नारळाचे भाव वधारले होते. त्यातच उन्हाळा वाढल्याने येणाऱ्या नारळांनाही तडे पडत आहेत. त्यामुळे आवक होणाऱ्या मालात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे.
– शिवकुमार वर्मा, नारळ विक्रेते