ठाणे : ठाण्यातील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांनी गद्दारांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा आमच्याबरोबर यावे, हिंदुत्वाचा झेंडा आपण पुढे घेऊन जाऊ, असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यातील सभेत केले.

ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांच्या डोंबिवली व ठाण्यात सभा झाल्या. दोन्ही सभांमधून उद्धव यांनी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना साद घातली. ‘शिवसेना-भाजपची युती अभेद्या ठेवण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाजन यांच्यामुळे भाजपला ओळख मिळाली. त्याच महाजन यांच्या मुलीला भाजपने उमेदवारी नाकारली. म्हणजे निष्ठावानांना डावलायचे आणि कल्याणमध्ये गद्दाराच्या मुलाला उमेदवारी द्यायची. भाजपची ही वाटचाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का,’ असा सवाल ठाकरे यांनी डोंबिवलीत मुसळधार पावसात झालेल्या प्रचार सभेत केला.

हेही वाचा >>> लोकसभा मताधिक्यावर पालिकेत उमेदवारी ; विनोद तावडे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय क्षितिजावर ओळख नव्हती, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती. त्याची तुम्ही अशी परतफेड करता का, असा सवाल उद्धव यांनी केला. मोदी हे आम्हाला नकली सेना म्हणतात. पण तुमचा भाजप नकली झाला असून त्यात सगळे आयात भाडोत्री आहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली. मुंबईत झालेल्या दुर्घटनेपासून काही अंतरावर मोदींनी प्रचार फेरी काढली. इतकी निर्दयता त्यांच्यात आली कुठून’, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.

मुसळधार पावसात सभा

कल्याणमधील मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेसाठी उद्धव ठाकरे डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे आले होते. सभा सुरू होताच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात भिजत उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. मुसळधार पाऊस ही आपल्या विजयाची नांदी आहे, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चार जूननंतर मोदीमुक्त भारत’

‘हे मोदींचे नव्हे तर गझनीचे सरकार ४ जूननंतर देशात नसेल. त्यामुळे भाजपमधील उरलेल्या धोंड्यांचे काय उरणार, हा प्रश्न आत्ता भाजपला सतावू लागल्याचा टोला त्यांनी लगावला.