डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी ते मानपाडा रस्ता या पोहच रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला बुधवारी मध्यरात्री पासून सुरुवात करण्यात आली. हे काम सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेऊन ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता विषयक उपक्रम

बुधवारी रात्री या रस्ते वाहतूक बदलाची अधिसूचना डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी जाहीर केली. अनेक वर्ष डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी ते मानपाडा पोहच रस्त्याची देखभाल दुरुस्ती न केल्याने हा रस्ता बारही महिने खड्डे, धूळ मातीने भरलेला होता. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे, चिखल, मातीचा गाळ असे चित्र होते. या रस्त्यावरुन डोंबिवली शहरातील बहुतांशी वाहने शिळफाटा दिशेने जातात. सोनारपाडा भागातील विद्यासंकुलाकडे जाणारी वाहने याच रस्त्याने येजा करतात. या खड्डेमय रस्त्याचा सर्वाधिक त्रास या भागातील उद्योजकांना होता. अनेक माल वाहतूक करणारे ट्रक चालक खड्ड्यामुळे माल वाहू ट्रक कंपनीपर्यंत घेऊन येण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे कंपनी मालकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी लागत होती.

हेही वाचा >>> ‘फॉक्सकॉन’ गेला म्हणून बोंबा ठोकणाऱ्यांकडून यापूर्वी मराठी उद्योजकांची छळवणूक ; उद्योग मंत्री उदय सामंत यांची टीका 

डोंबिवलीतून मानपाडा रस्ता, आईस फॅक्टरीकडून आणि गोग्रासवाडीतून शिळफाटा, सोनारापाडा दिशेने जाण्यासाठी हा महत्वपूर्ण रस्ता असल्याने खड्डे असुनही बहुतांशी वाहन चालक, रिक्षा चालक याच रस्त्याने येजा करत होते. या रस्त्याची डागडुजी करावी म्हणून प्रवासी पालिकेत तक्रारी करत होते.कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारीत हा रस्ता असल्याने कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी गणेशोत्सापूर्वी या महत्वपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्याचे नियोजन केले होते. परंतु, वाहतूक विभागाने गणेशोत्सवानंतर या रस्त्याचे काम सुरू करा, अशी सूचना केली होती. त्यामुळे वाहतूक विभागाची परवानगी घेऊन १५ दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेऊन काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे, असे वाहतूक विभागाचे उमेश गित्ते यांनी सांगितले.

वाहतूक बदल
या रस्ता दुरूस्तीच्या कामामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी मानपाडा रस्त्याने आईस फॅक्टरी चौकमार्गे साईबाबा मंदिर, पाथर्ली गोग्रासवाडीकडे जाणारी व येणारी सर्व प्रकारची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.मानपाडा रस्त्याने साईबाबा मंदिर मार्गे पाथर्ली-गोग्रासवाडीकडे जाणारी वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता मानपाडा रोडवरील शिव मंदिराजवळ,आईस फॅक्टरी चौक याठिकाणी पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. मानपाडा रस्त्याने साईबाबा मंदिरमार्गे पाथर्ली रस्त्याने गोग्रासवाडीकडे जाणारी सर्व वाहने आईस फॅक्टरी चौकातून मानपाडा रस्त्याने सरळ पुढे जाऊन स्टार कॉलनी, साईबाबा चौक येथे डावीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील. पाथर्ली गोग्रासवाडीकडून आईस फॅक्टरीमार्गे मानपाडा रस्त्याकडे येणारी वाहतूक साईबाबा मंदिर चौक याठिकाणी पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. पाथर्ली गोग्रासवाडीकडून आईस फॅक्टरीमार्गे मानपाडा रस्त्याकडे येणारी वाहने साईबाबा मंदिर चौक, पाथर्ली येथे डावीकडे वळण घेऊन एमआयडीसी रोडने आपल्या इच्छित स्थळी जातील.

आईस फॅक्टरी रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना रस्ता मजबुत व्हावा. या रस्त्यावरुन वाहतूक सुरूच ठेवली तर काम करताना अडथळे येतात. त्यामुळे १५ दिवस रस्ता बंद ठेऊन हा महत्वपूर्ण रस्ता काँक्रिटीकरणाचा केला जात आहे. – रोहिणी लोकरे , कार्यकारी अभियंता ,बांधकाम, डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commencement of concreting of ice factory manpada road in dombivli midc amy
First published on: 15-09-2022 at 11:48 IST