ठाणे : भिवंडी शहरातील नागरिकांना चांगली आणि घराच्या परिसरातच विनामुल्य आरोग्य सुविधा मिळावी, या उद्देशातून महापालिकेने शहरात चार ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारली आहेत. या केंद्रास भिवंडी निजामपूर शहर महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी बुधवारी सकाळी भेट देऊन तिथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा आणि कामाकाजाचा आढावा घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. आरोग्य वर्धीनी केंद्रातील वैद्यकिय अधिकारी यांनी दररोज बाह्यरुग्ण तपासणी आटोपल्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रातील १० ते १५ घरांना भेट देवून आरोग्य तपासणी करावी, अशी सुचना आयुक्त सागर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली.
केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र योजना राबविण्याची सुचना सर्वच शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना केली होती. त्यानुसार मुंबई महानगरातील भिवंडी निजामपूर शहर महापालिकेनेही शहरात चार ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केली आहेत तर, आणखी सहा ठिकाणी अशी केंद्र उभारली जाणार आहेत. या आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे भिवंडीतील नागरिकांना घराच्या परिसरातच आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहे. भिवंडी निजामपूर शहर महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी बुधवारी सकाळी भेट देऊन तिथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा आणि कामाकाजाचा आढावा घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी संदिप गाडेकर आणि शहर अभियंता जमील पटेल हे उपस्थित होते.
आयुक्तांनी कोणत्या सुचना केल्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या मार्गर्शक सुचनेनुसार वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या आरोग्य केंद्रातील ए.एन.एम., फार्मासिस्ट, आशा वर्कर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची दर पंधरा दिवसात बैठक घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घ्यावा. नोंदणी आणि अहवाल देणे यांचे सुसुत्रीकरण करून अद्यावत ठेवणे. ई-औषधींचा उपयोग करून प्रत्येक आरोग्य वर्धीनी केंद्रामध्ये ई-औषधी साठा दरवेळेस अद्ययावत करण्यात यावा आणि त्या नुसार औषधांची मागणी करण्यात यावी. तसेच नागरी आरोग्य केंद्रांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एन.सी.डी. स्क्रीनिंग शिबीर आठवडयात किंवा पंधरा दिवासांत आयोजित करावीत. आरोग्य वर्धीनी केंद्रातील वैद्यकिय अधिकारी यांनी दररोज बाह्य रुग्ण तपासणी संपल्यावर आपल्या कार्यक्षेत्रातील १० ते १५ घरांना भेट देवून आरोग्य तपासणी करावी, अशा सुचना आयुक्त सागर यांनी केल्या आहेत.
इथे आहेत आरोग्यवर्धिनी केंद्र
भिवंडी शहरातील भाग्यनगर आरोग्य केंद्र, नदीनाका आरोग्य केंद्र, पिसपार्क आरोग्य वर्धीनी केंद्र आणि स्व. टावरे स्टेडियम या चार ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आरोग्य वर्धीनी केंद्र सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर, आपला दवाखाना दुपारी २ ते रात्री १० यावेळेत सुरू असणार आहेत.
नवीन केंद्र उभारली जाणार टेमघर येथील मनपा जुन्या व्यायामशाळा इमारत, वॉर्ड क्रमांक १५ नवीवस्ती येथील माध्यमिक विद्यालय टेमघर लगतच्या आरोग्य कॅबीन, भादवड येथील छत्रतपती शिवाजी महाराज स्टेडीयम मधील तळ मजल्याची खोली, वॉर्ड क्रमांक १४ गोविंदनगर येथील मनपाचे देविदास गुळवी सांस्कृतीक केंद्रालगत असलेल्या महापालिका खोली, कामतघर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मधील तळ मजला सभागृह, अंजूरफाटा शिवाजीनगर जुने आरोग्य केंद्र, नारपोली, समरुबाग येथील शाळा क्रमांक ३९ जवळील जुने आरोग्य केंद्र, कै. परशुराम टावरे क्रिडा संकुलातील करोना केंद्र, अबिका नगर येथील वीर सावरकर उदयाना मधील सांसकतिक केद्र, याठिकाणी नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र उभारली जाणार आहेत. या आरोग्य केंद्रांच्या नुतनीकरणाबाबत आयुक्त सागर यांनी बांधकाम विभागास सुचना दिल्या आहेत.