कल्याण – मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात काय परिस्थिती आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेल्या भागात पालिका कर्मचारी कसे काम करतात. याविषयीचा आढावा मंगळवारी आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिकेच्या एकत्रित हुकुम आणि नियंत्रण प्रणाली केंद्रात येऊन घेतला.

यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, आप्कालीन नियंत्रण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, उपायुक्त समीर भुमकर उपस्थित होते. नियंत्रण केंद्रात थेट प्रक्षेपणातून शहर परिसरातील पावसाच्या पाण्याचा अंदाज घेता येतो. आणि आवश्यक त्या सूचना समपदस्थ अधिकाऱ्यांना करता येतात. कल्याण डोंबिवली शहरात दिवसभरात ७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ज्या सखल भागात पाणी तुंबल्याचे दिसत होते. त्या भागातील पाण्याचा निचरा का झाला नाही. तेथे आपत्कालीन विभागाचा कोणी कर्मचारी का दिसत नाही, अशी विचारणा आयुक्तांनी केली. यावेळी शहर अभियंता परदेशी यांनी संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांना पाणी साचलेल्या भागात आपत्कालीन कर्मचारी तातडीने पाठवून तेथील परिस्थिती सुस्थितीत करण्याच्या सूचना केल्या.

पालिकेच्या विविध भागात साहाय्यक आयुक्त, त्यांचे आप्कालीन पथक पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दृश्य आयुक्तांना नियंत्रण कक्षातून दिसत होते. ज्या भागात पूर परिस्थिती आहे. नागरिकांना आपल्या घरात राहण्यासारखी परिस्थिती नाही. त्या भागातील रहिवाशांना पालिकेकडून जवळच्या पालिका शाळेत, संक्रमण शिबिरात स्थलांतरित करत आहेत. पाण्याची पातळी पाहून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना ध्वनीक्षेपकावरून देण्यात येत आहेत.

पालिकेने स्थलांतरित केलेल्या, संक्रमण शिबिरात राहत असलेल्या नागरिकांनी भोजनाची पाकिटे आपत्कालीन कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. यामध्ये कोणतीही त्रृटी राहता कामा नये अशा सूचना आयुक्तांनी केल्या. दोन दिवस हवामान विभागाने मुसळधार पावसाचा धोक्याचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी आवश्यक काम असेल तरच बाहेर पडावे. अन्यथा घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आपल्या भागात पाणी साचले, घरात पाणी आले असेल तर तात्काळ पालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.

एकत्रित हुकुम आणि नियंत्रण प्रणाली केंद्र २४ तास सुरू असते. या केंद्राच्या माध्यमातून शहरातील हालचालींवर लक्ष ठेवता येते. अतिवृष्टी, महापुराच्या काळात या यंत्रणेचा खूप उपयोग होतो. बसल्या जागेहून आवश्यक सूचना करून आपत्कालीन पथकाला मार्गदर्शन करता येते. आपत्कालीन टोल फ्री क्रमांक १८००२३३००४५.

(.)