ठाणे : घोडबंदर मार्गावर वाहतुक कोंडी आणि खड्ड्यांची समस्या निर्माण झाल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. घोडबंदर मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांतून वाट काढताना प्रवाशांच्या नाकी नऊ येत आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताची भिती नागरिक व्यक्त करत आहेत.

घोडबंदर मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. हजारो शाळकरी विद्यार्थी, नोकरदार या मार्गावरुन ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत असतात. मागील काही वर्षांपासून या मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, रस्ते जोडणी प्रकल्पांची कामे सुरु आहेत. पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडत असल्याने आता मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागला.

येथील मानपाडा, पातलीपाडा, आनंदनगर, कासारवडवली भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे शारिरीक आणि मानसिक त्रासाचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे नोकरदारांना वेळेवर पोहोचणे कठीण होते, तर विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. अनेकदा अवघ्या काही मिनीटांच्या अंतरासाठी तास घालवावा लागतो. खड्डे आणि वाहतुक कोंडीमुळे यामुळे येथील रहिवाशांना त्यांच्या वेळापत्रकामध्येही बदल करावा लागत आहे.

गायमुख घाट तसेच घोडबंदर मार्गावरील खड्डयांची वारंवार दुरुस्ती करुनही खड्ड्यांचा प्रश्न सुटत नसल्याने येथील रहिवासी हवालदील झाले आहेत. घोडबंदर मार्गावर अनेकदा खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाने दिले. परंतु पाऊस पडल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडतात. खड्डे तात्पुरत्या स्वरूपाची बुजविण्यात येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते असमान झाले. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. – मारूती सुर्यतळे, प्रवासी