ठाणे : भिवंडी येथील दापोडे भागात कंपनीतील कर्मचाऱ्यांचे टेबलमधील ड्राॅवरमध्ये ठेवलेले १८ मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
दापोडे येथील सुविधीनाथ काॅम्प्लेक्समध्ये कंपनी आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसाठी मोबाईल दिले जातात. १८ जुलैला कंपनी बंद करण्यापूर्वी सर्व कामगारांनी त्यांचे मोबाईल कंपनीच्या टेबलमधील ड्राॅव्हरमध्ये ठेवून दिले. त्यानंतर ते सर्व कामगार निघून गेले. १९ जुलैला कंपनीच्या मालकांनी कंपनीमध्ये चोरी झाल्याची माहिती त्यांच्या कामगारांना दिली.
कामगारांनी तपासणी केली असता, कंपनीचे १८ मोबाईल चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाची पाहणी केली. त्यावेळी स्वच्छतागृहातील एक्झाॅस्ट फॅन काढून चोरट्याने कंपनीत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्याने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ मोबाईलची एकूण किंमत ९० हजार रुपये असल्याचे तक्रारीत दर्शविण्यात आले आहे.