डोंबिवली जवळील गोळवली, उंबार्ली परिसरातील सुमारे शंभर एकर परिसरात पसरलेल्या उंबार्ली टेकडीवरील वनसंपदेला शनिवारी रात्री भीषण आग लागली. आगीचे रौद्ररूप बघून या भागातील सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरा आग आटोक्यात आणली.
डोंबिवली जवळील गोळवली, दावडी, उंबार्ली, भाल गावांच्या परिसरात वन विभागाच्या जागेत सुमारे दीड ते दोन लाख झाडांनी नटलेली निसर्गसंपदा आहे. सुमारे शंभर एकर परिसरात लहान-मोठ्या टेकड्यांनी हे भौगोलिक क्षेत्र विस्तारले आहे. डोंबिवली, कल्याण परिसरातील रहिवासी दररोज सकाळ-संध्याकाळ उंबार्ली टेकडीवर निसर्ग संपदा, विविध प्रकारचे पक्षी प्राणी यांचा आस्वाद घेण्यासाठी येतात. रीजन्सी गृहसंकुलासह आजूबाजूच्या संकुला मधील रहिवासी ही या टेकडीवर सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. रिजन्सी संकुलाच्या पाठीमागून या टेकडीवर जाण्याचा मार्ग आहे. सावळाराम महाराज निसर्गप्रेमी संस्थेचे कार्यकर्ते, पाचशेहून अधिक निसर्गप्रेमी दररोज या टेकडीवर झाडांची देखभाल, नवीन रोपे लावून त्याला पाणी घालणे, त्यांचे संगोपन करणे अशी कामे करतात.
रात्री आग विझवण्यासाठी निसर्गप्रेमींची धावपळ
वनराईने डवरलेल्या या टेकडीला शनिवारी रात्री आग लागली. आगीमध्ये झाडे जळून खाक होतील, पक्षी, प्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होईल म्हणून निसर्गप्रेमी कार्यकर्त्यानी रात्रीच उम्बार्ली टेकडीवर जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. टेकडीवर झाडांना पाणी घालण्यासाठी लहान मोठी तळी तयार करण्यात आली आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाच हजार लिटरच्या दोन टाक्या या टेकडीवर बसवल्या आहेत. या टाक्यांमधील पाणी झाडांना पाणी घालणे, आग लागल्यास ती विझवण्यासाठी वापर केला जातो.
संतश्री सावता महाराज निसर्गप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी, सोनारपाडाचे माजी सरपंच मुकेश पाटील, संजय लोटे व इतर कार्यकर्त्यानी पाणी, झाडाच्या फांद्यांचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. वाळलेले गवत, वाळलेला पाला यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. जवानांनी रीजन्सी संकुलाकडील रस्त्याने अग्निशमन वाहने टेकडीच्या मध्यापर्यंत नेली. तिथून त्यांनी पाइपच्या साह्याने पाण्याचा प्रभावी मारा करून आग आटोक्यात आणली.
उंबार्ली पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी प्रयत्न
या जंगलात हरीण, भेकर, ससे, मोर, रानडुकरे, तरस विविध प्रकारचे पक्षी आहेत. पशु पक्ष्यांच्या शिकारी करण्यासाठी शिकारी जंगलांना वणवे लावतात. जंगलातील झाडे झुडपे गवत जळून खाक झाले की पक्षी, प्राणी यांना शिकारीसाठी शोधणे शिकारींना सोपे जाते, असे रहिवाशांनी सांगितले. या टेकडीवर मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्याकडून जैवविविधता उद्यान वनविभागाच्या सहकार्याने विकसित केली जाणार आहे. टेकडीवर नेहमी फिरण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना या उद्यानाचा लाभ व्हावा आणि एक पर्यटन स्थळ म्हणून उंबार्ली टेकडी विकसित व्हावी, हा आपला प्रमुख उद्देश आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले आहे .