लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: ठाणे जिल्ह्यातून सुरुवात होणाऱ्या काँग्रेसच्या सत्यागृह यात्रेत सावरकर यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात येणार असल्याचे विधान केले नसल्याचा दावा करत काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी घुमजाव केले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रदेश पातळीवरील नेत्यांनी दिलेल्या दट्टयामुळेच चव्हाण यांनी भुमिकेत बदल केल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे.

भारत जोडो यात्रा आणि हात जोडो यात्रांपाठोपाठ आता जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने घेतला असून या यात्रेची सुरुवात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून होणार आहे. शिवाय, महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक पहिल्यांदाच ठाण्यात होणार आहे. येत्या १० एप्रिलला ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा- “कडकसिंग बाण्यामुळे राज्यात अडीच वर्षे विकासकामांचा खडखडाट”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्याग्रह यात्रेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्यवीरांचा सन्मान म्हणून त्यांची छायाचित्र यात्रेत वापरली जणार असून त्यात सावरकर यांच्या छायाचित्राला स्थान असेल, असे विधान काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दोन दिवसांपुर्वी पत्रकारांशी बोलताना केले होते. या विधानावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी दिलेल्या दट्टयानंतर शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सत्यागृह यात्रेत सावरकर यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात येणार असल्याचे विधान केले नसल्याचा दावा करत घुमजाव केले. मी स्वातंत्र्यवीरांच्या छायाचित्रांना स्थान देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. स्वातंत्रवीर म्हणजेच केवळ सावरकर नव्हे तर इतरही अनेकजण आहेत. त्यामुळे मी केलेल्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्यात आला, असा दावाही त्यांनी केला. या यात्रेत कुणाचे छायाचित्र असावे किंवा नसावे हा सर्वस्वी अधिकार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना असतो आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.