डोंबिवली – एका भागाचे पाणी दुसऱ्या भागात. दुसऱ्या भागाचे पाणी अन्य भागात असे उद्योग काही मंडळींकडून कल्याण ग्रामीणमध्ये सुरू आहेत. बारवी धरणातील नवी मुंबईच्या वाट्याचे १४० दशलक्ष पाणी २७ गाव, एमआयडीसी, डोंबिवली भागाला मिळावे म्हणून १५ वर्षांपूर्वी निर्णय झाला आहे. हे पाणी २७ गावांसह डोंंबिवली शहर परिसराला मिळावे म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. परंतु, काही जण हे पाणी हळुहळू ठाण्याला पळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असा घणाघात मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी सोमवारी येथील पहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केला.

हे चोरच आहेत. पाणी चोरही आहेत. यांचा आमदारही आता पाणी चोरच असणार आहे, अशी पुष्टी राजू पाटील यांनी जोडली. कल्याण लोकसभा निवडणुकीच्यावेळी मनसेची महायुतीला साथ होती. त्यावेळी मनसेचे राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीणमधून उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. या बदल्यात कल्याण ग्रामीणमधील काही कामे मार्गस्थ लावण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी राजू पाटील यांना दिले होते. आता मदत करण्याची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे यांना उमेदवारी देऊन राजू पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं

पलावा येथील वाहन कोंडीमुळे प्रवासी त्रस्त आहेत. या भागातील उड्डाण पूल, दुसरा एक पूल मार्गी लागावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. पलावा चौकातील कामाचे आदेश ठेकेदाराला नसताना ते काम दामटून सुरू केले होते. दुसऱ्या पुलाच्या कामात अनधिकृत बांधकामे आहेत. ती वाचविण्यासाठी दुसऱ्या पुलाचे काम रखडविण्यात आले आहे. या बांधकामांवर यापूर्वी कारवाई झाली होती. ही बांधकामे कोण वाचवित आहे, असा प्रश्न उमेदवार पाटील यांनी केला.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात ९० उमेदवारांची निवडणुकीतून माघार, जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणूक काळात तुम्ही मला कल्याण ग्रामीणसाठी मदत करा. मी तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून २७ गावांसाठी निधी मिळून देतो असे आश्वासन खासदार डाॅ. शिंदे यांनी आपणास दिले होते. त्याप्रमाणे आपण ६९ कोटी २७ गावांतील विकास कामांसाठी मिळावे म्हणून पत्र दिले होते. नंतर हा विषय गुंडाळण्यात आला. त्यामुळे यांची दानत खोटी असल्याची टीका राजू पाटील यांनी शिंदे पिता-पुत्रांवर केली. आपणास इव्हेन्टवाला नाहीतर शाश्वत विकास पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कल्याण ग्रामीणमध्ये आपण आपल्या निधीतून, शासकीय निधीतून अनेक कामे केली. पण तेथे बबड्याच्या (खा. शिंदे) नावाच्या पाट्या लागल्या. हा त्रास आपण तीन वर्षे सहन केला, असे राजू पाटील यांनी सांगितले. कल्याण ग्रामीणमध्ये चढाओढीचे राजकारण करून २७ गावांचा बट्ट्याबोळ करण्यात आला. यांचे उपकार आपणास नकोच होते. आता आम्ही पण वचपा काढण्यास मोकळे झालो, असा इशारा पाटील यांनी शिंदे पिता-पुत्रांना दिला.