सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांचा दावा; तीन महिन्यांच्या उपचारानंतर पुन्हा कामावर रुजू

किशोर कोकणे

ठाणे :  ‘माझ्यावर फेरीवाल्यांनी केलेला हल्ला हे फक्त निमित्त होते. शहरात बोकाळत चाललेल्या बेकायदा बांधकामांविरोधात मी सुरू केलेली कारवाई अनेकांना खुपत होती. त्यामुळे बेकायदा बांधकामे करणाऱ्या माफियांचा माझ्या हल्ल्यामागे हात असू शकतो,’ असा दावा ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. फेरीवाल्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात डाव्या हाताची दोन बोटे गमावलेल्या कल्पिता पिंपळे या तीन महिन्यांच्या उपचारानंतर ठाणे महापालिका मुख्यालयात कर्तव्यावर रुजू झाल्या.

डाव्या हाताची दोन बोटे गमावल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या उजव्या हातावरही जाणवत आहे. अजूनही उजवा हात थरथरतो, असे पिंपळे यांनी सांगितले. तीन महिने परावलंबी आयुष्य जगावे लागले, याचा अनुभवही त्यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केला.

 घोडबंदर येथील कासारवडवली भागात ३० ऑगस्टला रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर एका फेरीवाल्याने चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तूटून पडली होती. डाव्या हाताची बोटे तुटल्याने त्यांचे दोन्ही हातही निकामी झाले होते. उपचार आणि तीन महिन्यांच्या विश्रातीनंतर िपगळे बुधवारी महापालिका मुख्यालयात कामावर रुजू झाल्या. 

लोकसत्ताने पिंपळे यांच्याशी यानिमीत्ताने संवाद साधला. ‘माझ्यावर फेरीवाल्याने केलेला हल्ला हे फक्त निमित्त ठरले. या हल्ल्यामागे बेकायदा इमारती उभे करणारे बांधकाममाफियाच आहेत असा माझा आजही दावा आहे,’ असा पुनरुच्चार पिंपळे यांनी केला. महापालिका अधिकारी फेरीवाल्यांविरोधात नाहीत हे मुळात समजून घ्यायला हवे. जे फेरीवाले नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर कारवाई होते आणि ती व्हायलाही हवी, असेही त्या म्हणाल्या. 

पुन्हा बोटे बसविणे अशक्य

ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आपल्या प्रकृतीत सुधारणा झाली असून उजवा हात ७५ टक्के काम करू लागला आहे, असे कल्पिता पिंपळे यांनी सांगितले. मात्र, डाव्या हाताच्या उपचारासाठी आणखी दोन ते तीन महिने लागतील, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले आहे. तुटलेल्या बोटांऐवजी कृत्रिम बोटे बसवली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कल्पिता पिंपळे या उजवा हात काम करू लागल्याने तात्काळ रुजू होण्यास आल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर पूर्णपणे उपचार झाले नसल्याने सध्या त्यांच्याकडे कोणत्याही विभागाचा कार्यभार देण्यात आलेला नाही. तसेच त्यांना अजूनही विश्रांती घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.

कुटुंबीयांनी सावरले

‘हल्ल्यानंतर काही काळ माझे दोन्ही हात निकामी झाल्याची परिस्थिती होती. मी पूर्णत: परावलंबी झाले होते. जेवणही अन्य कुणाला तरी भरवावे लागत होते. मोठा भाऊ आणि वहिनीने माझी खूप काळजी घेतली. माझा १२ वी इयत्तेत शिकणारा मुलगा वेद हा मला केस िवचरण्यापासून सर्व प्रकारची मदत करायचा. माझ्या मैत्रिणी आणि महापालिकेतील अधिकारी अश्विनी वाघमळे, मोहिनी ससाणे, प्रणाली घोंगे यांचीही या काळात मदत झाली. या तिघींनी मनोबल उंचवण्यासाठी माझी साथ केली. महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त बिपीन शर्मा वेळोवेळी माझ्या प्रकृतीची विचारपूस करत होते,’ अशा शब्दांत पिंपळे यांनी सर्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.