कोंडी टाळण्यासाठी पालकमंत्री शिंदे यांचा निर्णय

ठाणे : विविध कारणांनी निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी जिल्ह्यात चार ठिकाणी अवजड वाहनांकरिता वाहनतळांची  निर्मिती करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी घेतला. या निर्णयानुसार नवी मुंबई, खारेगाव, शहापूर, दापचारी  येथे अवजड वाहनांकरिता वाहनतळ निर्माण करण्यात येणार आहेत. 

शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊन त्यात नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे. त्यातच सोमवारी मध्यरात्री टँकर उलटल्यामुळे घोडबंदर मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका ठाणे तसेच आसपासच्या शहरातील वाहतुकीला बसला. या वाहतूक कोंडीची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीस ठाणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनय राठोड, मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

अवजड वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची जागा निश्चित करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. तसेच ते आज नवी मुंबई, खारेगाव, शहापूर आणि दापचारी येथील मोकळ्या जागांची पाहाणी करून वाहनतळाची जागा निश्चित करणार आहेत. ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हे नियोजन असेल.

नियोजन असे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेएनपीटीतून निघणारी वाहने जेएनपीटीच्या शेजारील वाहनतळामध्ये थांबवण्यात येणार आहेत. नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डी-सोनाळे-दापोडे येथे थांबवण्यासाठी, अहमदाबाद येथून येणारी वाहने दापचारी येथे थांबवण्यासाठी, ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी खारेगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस वाहनतळ तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी अवजड वाहने रोखून  टप्प्याटप्प्याने  शहरात सोडण्यात येणार आहेत.