ठाणे : ठाणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना आणि कामगार एकजूट संघटनेच्या नेतृत्त्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलकांना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भेट देऊन मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
ठाणे महापालिकेत अनेक वषार्पासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करा, भरती प्रक्रिया मध्ये जागा राखीव ठेवणे, वैद्यकीय विमा योजना कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्याला लागू करावी, किमान वेतन लागू करावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भेट दिली. वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथील लोकांना सेवा देण्याचे काम कंत्राटी कामगार करीत आहेत. हे कामगार गेली अनेक वर्षे अनेक ठिकाणी गेले, परंतु त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. आता त्यांच्या समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन आमदार केळकर यांनी दिले