ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आपला दवाखाना उपक्रम बंद पडल्याच्या मुद्यावरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासनावर टीका केली होती. यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये वादंग वाढण्याची चिन्हे असतानाच, वादात सापडेलल्या आपला दवाखाना उपक्रमाच्या ठेकेदारावर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाई करत त्याचा काळ्या यादीत समावेश केला आहे. याशिवाय, डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना थकीत पगार दोन दिवसांत दिला जाणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घराजवळच मोफत आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून सुरु केलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला असून याठिकाणी काम करणारे डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. तसेच बंद पडलेल्या दवाखान्यांच्या जागेवर साड्यांची दुकाने सुरू झाली आहेत. हा मुद्दा आमदार केळकर यांनी उपस्थित करत प्रशासनावर टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी असलेला आपला दवाखाना हा प्रकल्प वादात सापडल्यानंतर पालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिले होते.
मात्र, कारवाई करण्याऐवजी स्पष्टीकरण देण्यात पालिका प्रशासन धन्यता मानत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी दिली होती. दरम्यान, या प्रकरणी त्यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दोन दिवसांतच सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे थकीत पगार त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. या दवाखान्यांच्या जागेचे थकलेले भाडेही लवकर दिले जाणार आहे. संबंधित कर्नाटकातील ठेकेदाराचा काळ्यात यादीत समावेश करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त राव यांनी भेटीदरम्यान दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.
तर कारवाईचा इशारा
बंद पडलेल्या आपला दवाखाना या उपक्रमाला पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाच्या माध्यमातून ४४ ठिकाणी आरोग्य मंदिरे उभे करण्याचे काम सुरू झाले आहे. नोव्हेंबरपर्यंत हा आकडा ६८ वर जाईल. पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष आरोग्य सेवा मिळाली नाही तर त्यावर कठोर पावले उचलली जातील, असा इशारा केळकर यांनी दिला.
