Thane News : ठाणे : ठाण्यातील सांस्कृतिक वैभव असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहातील १९७८ आणि १९९९ साली उभारण्यात आलेल्या कोनशिलांना रंगायतनाच्या नुतनीकरणानंतर एका कोपऱ्यात स्थान देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या कोनशिलांवर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांची नावे होती. ठाण्याचा इतिहास पुसण्याचे काम ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून सुरु आहे. सौरभ राव यांना ठाण्याची संस्कृती, इतिहास काय माहित… पण जे राज्यकर्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा चालवित असल्याचे म्हणतात. त्यांनी तरी ही चूक दुरुस्त करावी असा टोला परांजपे यांनी शिंदे गटाला लगावला.

ठाण्यातील गडकरी नाट्यगृहाच्या नुतनीकृत वास्तूचे लोकार्पण नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. गडकरी रंगायतन नाट्यगृहातील या नव्या वास्तूमध्ये १९७८ आणि १९९९ साली उभारण्यात आलेल्या दोन कोनशिलांना एका कोपऱ्यात स्थान देण्यात आल्याने माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी आनंद परांजपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी दिला. गडकर रंगायतनची वास्तू तयार देखील झाली. १९७८ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते वास्तूचे भुमीपूजन झाले होते. तेव्हा नगराध्यक्ष सतीष प्रधान प्रधान होते. तर प्रमुख पाहुणे दत्ताजी ताम्हणे हे होते. १९९९ मध्ये गडकरी नाट्यगृहाचे नुतनीकरण झाले होते. त्यावेळी देखील वंदनीय बाळासाहेबांच्या हस्ते झाले. तेव्हा महापौर प्रेमसिंग रजपूत होते, तर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची विशेष उपस्थिती होती. त्यावेळेच्या कोनशिला उभारण्यात आल्या होत्या. त्या दोन्ही कोनशिला दर्शनी भागात होत्या. तो एक इतिहास होता गडकरीच्या वास्तूचा, ठाणे शहराचा. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम झाले. परंतु हा इतिहासच पुसण्याचे काम प्रशासन म्हणून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. ही सर्व घोडचूक प्रशासनाने केली आहे अशी टीका परांजपे यांनी केली. या दोन्ही कोनशिला दर्शनी भागात लावाव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत असल्याचे परांजपे म्हणाले.

महापालिका आयुक्त सौरभ राव हे मनमानी कारभार चालवितात. सौरभ राव यांना ठाण्याची संस्कृती, इतिहास काय माहिती? पण जे राज्यकर्ते आहेत. जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा चालवित असल्याचे म्हणतात. त्यांनी तरी ही चूक दुरुस्त करावी असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.