ठाणे : करोनाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी त्यांना आवश्यक ती औषधे देऊन त्यांचे गृहअलगीकरण करावे असे आदेश गुरुवारी ठाणे महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशाराही ठाणे महापालिकेने रुग्णालयांना दिला आहे. ठाणे शहरात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ आढळून येत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे नसल्यास रुग्णांच्या शरीराचे तापमान आणि प्राणवायूच्या पातळीची तपासणी करावी. रुग्णास ताप नसल्यास प्राणवायूची पातळी योग्य असल्यास रुग्णाला ३ ते ४ दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवण्याऐवजी गृहअलगीकरणासाठी आवश्यक त्या औषध उपचारासहित सोडून द्यावे असे आदेश ठाणे महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिले आहेत.
रुग्णाला घरी सोडताना आठवडाभर गृहअलगीकरण करणे आवश्यक असून त्याबाबतच्या सूचना रुग्णांना द्याव्यात. असेही ठाणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यांच्यामार्फत रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी पथकामार्फत रुग्णस्थिती पडताळून पाहण्यात येणार आहे. अतिसौम्य लक्षणे असणारे रुग्ण ३ ते ४ दिवसाच्यापेक्षा अधिक दिवस रुग्णालयात दाखल असल्याचे आढळून आल्यास रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही महापालिकेने आदेशात म्हटले आहे.