व्यासपीठापासून प्रेक्षागृहापर्यंत मुखपट्टी, अंतर नियमांचे उल्लंघन

ठाणे : शहरात भाजपने बुधवारी दुपारी आयोजित केलेल्या कोकण विभागीय ओबीसी जागर मोर्चा समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. व्यासपीठावर बसलेले अनेक नेते आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी मुखपट्टी लावलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने या ठिकाणी अंतर नियमांची पायमल्ली झाली.  

राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाची लढाई सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून ओबीसी आरक्षण केंद्रामुळे रद्द झाल्याची खोटी ओरड केली जात असून त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून ओबीसी जागर मोर्चा सुरू केला होता. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात हा मोर्चा झाल्यानंतर कोकण विभागात घेण्यात आला. या मोर्चाचा समारोप कार्यक्रम ठाण्यातील टिपटॉप प्लाझा हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांपैकी अनेकांनी तोंडाला मुखपट्टी लावलेली नव्हती. तसेच व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुच्र्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्येही अंतर नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते एकमेकांच्या बाजूला बसले होते. या कार्यक्रमात मुखपट्टी, अंतरनियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

सूत्रसंचालकाच्या सूचनेकडे दुर्लक्ष कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये आणि तोंडाला मुखपट्टी लावावी, अशा सूचना कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सूत्रसंचालकाकडून सातत्याने केल्या जात होत्या. या सूचनेनंतर काहीजण मुखपट्टी लावत होते. पण, काही वेळातच ती पुन्हा काढत होते. ज्यांच्याकडे मुखपट्टी नव्हती, त्यांना मुखपट्टीचे वाटपही कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आले. त्यानंतरही अनेकांच्या तोंडावर मुखपट्टी नसल्याचे चित्र दिसून आले.