करोना चाचणीसाठी रांगा, आरोग्य केंद्रातील कर्मचारी लसीकरणात व्यग्र 

डोंबिवली : आरोग्य केंद्रातील कर्मचारी लसीकरण केंद्रावर वर्ग करण्यात आल्याने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत चाचणी केंद्रांवर मात्र पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी गोंधळ पहायला मिळत आहे. पालिकेच्या करोना चाचणी केंद्रावर पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांना चाचणीसाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागते.

 डोंबिवलीत सद्यस्थितीत करोनाचे २८६ रुग्ण, कल्याणमध्ये २४१, टिटवाळा येथे १६ रुग्ण उपचाराधीन आहेत. खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यात ताप, सर्दी, खोकला, वातावरण बदलल्याने होणाऱ्या आजारांच्या रुग्णांची गर्दी होत आहे. संशयित रुग्णांना डॉक्टर करोना चाचणी करण्यास सांगत आहेत. असे रुग्ण पालिकेच्या करोना चाचणी केंद्रावर गेले की तेथे एक ते दोन कर्मचारी कार्यरत असल्याचे रुग्णांना दिसते. चाचणी केंद्रातील एक कर्मचारी चाचणीसाठी आलेल्या रुग्णाच्या नोंदी करून घेतो. त्याची करोना चाचणी करून त्याला सही शिक्का देऊन अहवाल तातडीने देण्याचे काम करतो. या सगळ्या प्रक्रियेत चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. त्यामळे रांगेत असलेल्या रुग्णांना तिष्ठत बसावे लागते.

अनेक रुग्णांना अशक्तपणा असल्याने त्यांना रांगेत उभे राहता येत नाही. चाचणी केंद्राबाहेर २० ते २५ रुग्ण बसतील एवढीच सोय आहे. रांगेतील उर्वरित बाधितांना दोन ते तीन तास उभे राहावे लागते. एकीकडे ताप, सर्दी, खोकल्याच्या संशयितांनी तातडीने करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन पालिकेकडून केले जाते. पालिकेच्या केंद्रावर चाचणीसाठी गेले की तेथे रखडावे लागते, अशा तक्रारी चाचणी केंद्रावरील बाधितांनी केल्या.

रांगेमध्ये वृद्धही उभे असतात. चाचणी केंद्रात गेले की तेथे प्रथम प्रतिजन (अ‍ॅन्टीजेन) चाचणी केले जाते. ती चाचणी सकारात्मक की नकारात्मक येते त्यानंतर कर्मचारी रुग्णाची करोना चाचणी (आरटीपीसीआर) चाचणी करण्यास सांगतात. दरम्यानच्या अर्धा तासाच्या कालावधीत रुग्णाला चाचणी केंद्रावर थांबावे लागते किंवा त्याला घरी जाऊन पुन्हा चाचणी केंद्रावर येण्याची कसरत करावी लागते.

यासंदर्भात पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले, आरोग्य केंद्रांमधील कर्मचारी वर्ग चाचणी केंद्रांमध्ये पूर्ण क्षमतेने काम करत होतो. शाळांमध्ये, फिरत्या लसीकरण केंद्रांवर आरोग्य केंद्रातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे चाचणी केंद्रावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. चाचणी केंद्रावर रुग्णांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने काळजी घेतली जाते. अधिक माहितासाठी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना संपर्क केला. त्या बैठकीत व्यग्र असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.