किशोर कोकणे
ठाणे : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या सत्राचा निकाल अद्याप मिळालेला नाही. परदेशातील विद्यापीठे या विद्यार्थ्यांकडून त्यांचे निकाल पत्र मागवीत आहेत. हाती निकाल नसल्याने कोणते पुरावे जोडावेत, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. या परिस्थितीतून जाताना विद्यार्थ्यांना मानसिक ताणही येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
देशात पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी परदेशाची वाट धरतात. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांसारख्या देशात असतो. या वर्षी ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जात आहेत. ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या केंद्रांवर अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी पदवीचा निकाल लागण्यापूर्वी परदेशातील विद्यापीठांमध्ये ऑनलाइन माध्यमातून प्रवेश परीक्षा दिल्या होत्या. अभ्यासाच्या बळावर हे विद्यार्थी प्रवेश परीक्षाही उत्तीर्ण झाले. परदेशात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिकेच्या वतीने या विद्यार्थ्यांचे लसीकरणही सुरू होते. लसीकरण झाल्यानंतर परदेशी शिक्षणासाठी दारे खुली झाली, असे या विद्यार्थ्यांना वाटत असताना आता नव्या अडचणी या विद्यार्थ्यांसमोर आल्या आहेत.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अद्यापही विद्यापीठांकडून निकाल आणि पदवी प्रमाणपत्र मिळालेले नाही. परदेशातील विद्यापीठे विद्यार्थ्यांकडून त्यांची शैक्षणीक कागदपत्रे आणि पदवी प्रमाणपत्र जोडण्यासाठी ई-मेलद्वारे संपर्क साधत आहेत. हाती निकालच नसल्याने कोणती कागदपत्रे जोडावी आणि विद्यापीठाला काय उत्तर द्यावे असा प्रशद्ब्रा विद्यार्थ्यांना पडला आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यांत परदेशातील अनेक विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. येत्या काही दिवसांत विद्यापीठांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास यावर्षीचे शैक्षणिक वर्ष वाया जाते का, याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.
मी मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयातून पदवी शिक्षणाची शेवटच्या सत्राची परीक्षा दिली आहे. अद्यापही निकाल लागलेला नाही. मला इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचे आहे. तेथील एका विद्यापीठाची मी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. प्रवेश मिळविण्यासाठी विद्यापीठाकडून माझ्या निकालाच्या प्रती मागविण्यात येत आहे. मात्र माझ्याकडे निकाल नाही. येत्या काही दिवसांत निकालाच्या प्रती विद्यापीठाला दिल्या नाहीतर माझे शैक्षणिक वर्ष वाया जाईल. – श्रेया मांगले, विद्यार्थिनी