शोधाशोध करताना आरोग्य विभागाची दमछाक

ठाणे : भिवंडी येथील चिंबीपाडा आश्रमशाळेत करोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी त्यांच्या पालकांबरोबर घरी निघून गेल्याने करोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि काही सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांनंतर केवळ चार बाधित मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच अन्य मुलांच्या पालकांशी संपर्क करून त्यांनाही त्यांच्या मुलांना पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 चिंबीपाडा येथे पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आश्रमशाळा आहे. या  आश्रमशाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना सोमवारी ताप आणि सर्दीचा त्रास जाणवू लागला होता. एकूण मुलांपैकी १९८ विद्यार्थ्यांची  चिंबीपाडा येथील प्राथमिक आरोग्य  केंद्रात  करोना चाचणी करण्यात आली. चाचणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २८ मुलांचे, तर दोन कर्मचाऱ्यांचे करोना अहवाल हे सकारात्मक आले होते. या २८ विद्यार्थ्यांमध्ये २३ मुली तर ५ मुलांचा समावेश आहे.  चिंबीपाडा आश्रमशाळेत करोनाचा शिरकाव झाल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी सर्व पालकांनी शाळेकडे धाव घेतली. घाबरलेल्या मन:स्थितीत असलेल्या पालकांनी आपल्या मुलांना घेऊन लागलीच घर गाठले. यावेळी काही पालकांना आश्रमशाळा व्यवस्थापनातील काही कर्मचाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळाच्या परिस्थितीत पालकांना रोखणे त्यांना शक्य झाले नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

दरम्यान या प्रकारानंतर जिल्हा आरोग्य विभाग, तालुका अधिकारी आणि काही सामाजिक संस्था यांनी बाधित मुलांच्या घरांचा लगेचच शोध घेतला. त्यांच्या पालकांची समजूत काढली. तसेच मुलांमध्ये कोणतेही गंभीर स्वरूपाची लक्षणे नसल्याने आणि त्यांची प्रकृती उत्तम असल्याने  जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्याऐवजी त्यांचे आश्रमशाळेतच विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे पालकांना सांगण्यात आले. त्यानंतर काही पालकांनी आपल्या मुलांना उपचारासाठी आश्रमशाळेत पाठवले आहे. तर उर्वरित मुलेदेखील उपचारासाठी दाखल होणार असल्याचे आणि त्यांच्या पालकांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची लक्षणे दिसल्यास करोना चाचणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले आहेत. 

पालकांनी अशा पद्धतीने घाबरून जाऊन करोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणे गैर आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे बाधित मुलांच्या सर्व पालकांशी संपर्क साधला जात आहे. पालकांची समजूत काढून त्यांच्या मुलांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात येत आहे. तसेच मुलांच्या संपर्कात आलेल्यांची करोना चाचणीदेखील करण्यात येत आहे. – डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे</p>