ठाणे : करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून ठाणे महापालिका क्षेत्रात मंगळवारी म्हणजेच आज २४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या ६० इतकी झाली आहे. यातील चार रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली.

गेले काही दिवसांपासून ठाणे शहरात करोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरात मंगळवारी आणखी २४ करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील करोना रुग्णांची संख्या ६० इतकी झाली आहे. यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला होता. तर, उपचार सुरु असलेल्या चार रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वरित ५५ रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. यापैकी ४६ रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे हे रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. नऊ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या नऊ रुग्णांपैकी सात रुग्ण खासगी रुग्णालयात आणि दोन रुग्ण कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.