जयेश सामंत, नीलेश पानमंद, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : करोनाबाधित रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये  परवडणाऱ्या दरात  उपचार मिळावेत, यासाठी ठाणे महापालिका प्रशासन आणि शहरातील काही बडय़ा रुग्णालयांच्या व्यवस्थापनात गुरुवारी बैठक झाली. मात्र,  बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेले सवलतीचे दरपत्रकही प्रत्यक्षात सर्वसामान्य रुग्णांचा खिसा कापणारेच ठरेल, अशी चिन्हे आहेत.

या करोनावरील रुग्णालयातील सर्वसामान्य विभागात दाखल व्हायचे झाले तरी रुग्णांना प्रतिदिन चार हजार रुपयांचा खर्च येणार असून यामध्ये औषधे, सर्जिकल साहित्याचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला नाही. स्वतंत्र खोली किंवा विभागून खोली घ्यायची असेल तर हा खर्च पाच ते सात हजार रुपये प्रति दिन इतका येणार असून एखादा रुग्ण अतिदक्षता कक्षात दाखल झाल्यास किमान दहा हजार रुपये प्रति दिन इतका खर्च त्याला सोसावा लागणार आहे.

करोनाबाधित असलेल्या रुग्णावर दहा ते १४ दिवस या कालावधीत उपचार केले जातात. त्यामुळे हा कालावधी लक्षात घेतल्यास खासगी कोव्हिड रुग्णालयात दाखल होणे सर्वसामान्यांसाठी महागडेच ठरेल, अशी चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांना कोव्हिड उपचार रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. महापालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण दाखल होत असल्याने अनेक रुग्णांना या खासगी रुग्णालयात दाखल व्हावे असे सुचविले जात आहे. मात्र, येथे उपचारासाठी येणारा खर्च परवडणारा नाही, अशा तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. त्यामुळे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी गुरुवारी सायंकाळी शहरातील कोव्हिड रुग्णालयांच्या व्यवस्थापनांशी चर्चा केली.

पिवळे, केशरी रेशनकार्ड आणि मध्यम उत्पन्न गटातील रुग्णांसाठी सवलतीचा दर जाहीर करावा, अशा सूचना आयुक्तांनी या वेळी खासगी कोव्हिड रुग्णालयांच्या व्यवस्थापनांना दिल्या. त्यानुसार नवे दरपत्रकही जाहीर करण्यात आले. मात्र, या दरपत्रकातील दर पाहाता मध्यमवर्गीयांना हे उपचार महागडेच ठरतील अशी चिन्हे आहेत.

प्रतिदिन उपचार खर्च

गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या दरपत्रकानुसार खासगी कोव्हिड रुग्णालयातील सामान्य कक्षामध्ये उपचारासाठी रुग्णाकडून प्रतिदिन चार हजार रुपये आकारले जाणार आहे. त्यात बेड चार्जेस, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे.

शेअरिंग कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन पाच हजार,तर स्वतंत्र कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन सात हजार रुपये आकारले जाणार आहेत. त्यात रुग्णखोली, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे, तर अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दहा हजार रुपये आकारले जाणार असून व्हेंटिलेटरसाठी अतिरिक्त प्रतिदिन दोन हजार रुपये आकारले जाणार आहेत. प्रत्यक्ष वापरात आलेली औषधे आणि सर्जिकल साहित्याचा खर्च यामध्ये बाजारभावापेक्षा १५ टक्के कमी दराने आकारणी करण्यात येणार आहे. याशिवाय, इन्शुअर्ड रुग्ण तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा रुग्णांकडून नेहमीच्या दराने उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली.

..तर किमान ७५ हजार शुल्क

करोनाबाधित रुग्ण आढळल्यास अशा रुग्णावर उपचारादरम्यान किमान १४ दिवस त्याचे विलगीकरण केले जाते. त्यामुळे एखाद्या रुग्णाचा १० ते १४ दिवस अशा खासगी रुग्णालयांमध्ये मुक्काम राहिल्यास या दरपत्रकानुसार त्याला किमान ७५ हजारांचे शुल्क आकारले जाऊ शकते, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus treatment costly in private hospital zws
First published on: 01-05-2020 at 04:28 IST