ठाणे जिल्ह्यात भूत उतरविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे आणि मुलीच्या आईसोबतही अश्लील कृत्य केल्याप्रकरणी आरोपी भोंदूबाबाला १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. या प्रकरणी पॉक्सो आणि जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालो होता. त्याची सुनावणी विशेष पॉक्सो न्यायालयात झाली. न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी या प्रकरणी निकाल सुनावला.

आरोपी मिस्रीबाबा उर्फ रामलाल सुखदेव शर्मा याने तक्रारदार महिलेला (वय – ३५ वर्ष) तुम्हाला भूत लागलेले असल्याचं सांगितलं. तसेच मी तुमचे भूत पिशाच्च काढून टाकतो असे सांगून तक्रारदार महिलेच्या १४ वर्षीय मुलीला किचनमध्ये मंत्रपठण करून शरीराला दोरा बांधण्याच्या बहाण्याने नेलं. आरोपीने मुलीला किचनमध्ये घेऊन जाऊन तिचे कपडे काढले आणि तिच्या छातीवरून हात फिरवून तिच्या संमतीशिवाय जबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. याशिवाय आरोपीने तक्रारदार महिलेसही किचनमध्ये घेऊन जाऊन अश्लील कृत्य केले.

या प्रकरणी तक्रारदार महिलेने २८ सप्टेंबर २०१५ रोजी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक डी. के. चंदनकर आणि पोलीस निरिक्षक डी. डी. टेले यांनी केला. या प्रकरणी २१ डिसेंबर २०१५ रोजी दोषारोप पत्र सादर करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी विशेष पॉक्सो न्यायाधीश के डी शिरभाते यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारतर्फे सरकारी वकील संजय मोरे यांनी एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले.

या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना मंगळवारी (१० मे) दोषी ठरवून IPC 376 (I) मध्ये १० सश्रम कारावास आणि २ हजार रुपयांच्या दंडाची व दंड न भरल्यास २ महिने आणखी सश्रम कारावासाची शिक्षा दिली. याशिवाय पॉक्सो कलम ३, ४ प्रमाणे १० वर्षे सक्षम कारावास आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ कलम ३, २ प्रमाणे ६ महिने सक्षम कारावास व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ३ महिने सक्षम कारावास अशी शिक्षा देण्यात आली.

हेही वाचा : आपल्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; नंतर राजकीय नेत्याकडे नेलं अन्…

या प्रकरणी न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी पोहवा म्हणून सुनिल खैरे यांनी काम पाहिले.