मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दररोज दिवसाला २०० ते २५० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. करोनाच्या या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वत:हून लसीकरण केंद्रावर जाऊ लागली आहेत. त्यामुळे ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांवर पुन्हा नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे वर्धक मात्रा घेणाऱ्या नागरिकांचे असल्याची माहिती समोर आली आहे.

करोनाचा प्रादूर्भाव ओसरल्यामुळे काही महिन्यांपूर्वी निर्बंध शिथील करण्यात आले होते. तसेच नागरिकांच्या मनातूनही करोनाची भिती नाहिशी झाली होती. त्यामुळे अनेकांनी करोना लस घेण्याकडे पाठ फिरवली होती. तरी, खबरदारीचा उपाय म्हणून करोनापासून बचाव करण्यासाठी जानेवारी महिन्यापासून सर्वत्र ठिकाणी वर्धक मात्रा देण्यास सुरुवात झाली. ज्या नागरिकांना दुसरी मात्रा घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांना वर्धक मात्रा दिली जात आहे. परंतू, करोनाचा प्रादूर्भाव ओसरल्यामुळे नागरिकांनी वर्धक मात्रा घेण्याकडे दूर्लक्ष केले होते. त्यामुळे सुरुवातीला वर्धक मात्रेला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.

मात्र, मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या करोना प्रादूर्भावामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात पूर्वी दिवसाला १ हजार ते दीड हजार वर्धक मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या होती. परंतू, चार ते पाच दिवसांपासून या संख्येत वाढ होऊन ही संख्या २ हजार ते अडीच हजारापर्यंत पोहोचली असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे वैदयकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.

“करोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे. वर्धक मात्रा घेण्यासाठी नागरिक स्वत:हून केंद्रावर येत आहेत. त्यामुळे करोनापासून संरक्षण करण्यासाठी करोना प्रतिबंधात्मक लस हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचे लसीकरण अद्याप पूर्ण झाले नाही त्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे,” असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केलं आहे.