एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी श्रीनगर पोलिसांनी चौकशीसाठी आणलेल्या महेश आमरे या संशयिताने अधिकारी-कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करीत पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
किसननगर येथील भटवाडी परिसरात महेश आमरे राहत असून त्याला एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी श्रीनगर पोलीस ठाण्यात आणले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांनी त्याला एका जागेवर बसण्यास सांगितले. याचा राग आल्याने महेशने त्यांचे कपडे पकडून त्यांना ढकलून दिले. यानंतर कोळी आणि इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मोठमोठय़ाने आरडाओरड केला. तसेच ठाणे अंमलदार जवळील खिडकीची काच तोडून लॅकअप गार्डसमोरील सेफ्टी दरवाज्यास जोरजोराने धक्का मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
केला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरीच्या आमिषाने गंडा
ठाणे : सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने तरुणाला साडे सात लाखांना गंडा घातला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात त्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष खंडू गायकर आणि संगीता गायकर असे दाम्पत्याचे नाव असून या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. या दोघांनी सिद्धेश तुळसकर यांच्याकडून सात लाख ६० हजार रुपये घेतले. मात्र, पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सिद्धेशच्या लक्षात आले. याप्रकरणी सिद्धेशच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात पावणे सात लाखांची चोरी
ठाणे : पाचपखाडी भागातील ऑटोमोबाइल दुकानाच्या छताचा पत्रा तोडून चोरटय़ांनी सहा लाख ८९ हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना बुधवारी घडली आहे. ठाणे येथील खारकर आळीतील अभिषेक हाईटस्मध्ये किशोर पारेख राहत असून त्यांचे पाचपखाडीतील नामदेवीवाडी भागात दुकान आहे. बुधवारी दुपारी त्यांचे दुकान बंद होते. यावेळी चोरटय़ांनी या दुकानाच्या छताचा पत्रा तोडून आत प्रवेश केला. यानंतर टेबलाच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेली सहा लाख ८९ हजारांची रोकड लुटून नेली.