– केबल ऑपरेटरची खिडकाळीत हत्या
– ठाणे : खिडकाळी गाव येथे राहणारा विकी ऊर्फ विकास वसंत पाटील (२३) यांची अनोळखी व्यक्तींनी शनिवारी हत्या केली असून इंटरनेट केबल नेटवर्क व्यवसायाच्या वादातून तसेच अन्य कारणावरून ही हत्या झाली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. विकी याच्या गळ्यावर, हातावर, चेहऱ्यावर धारदार हत्यारांनी वार करून त्यांची हत्या करण्यात आली. रविवारी त्याचा मृतदेह खिडकाळी येथील त्यांच्या घरापासून काही दूर अंतरावर असलेल्या पीडब्ल्यूडी रो हाऊसच्या बाजूच्या गल्लीत आढळून आला. या प्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– दोन लाखांची चोरी
– कल्याण : मुकेश गाला हे शिवाजी चौक येथील हनुमान मंदिरासमोरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या हातावर जोराचा फटका मारून हातातील पिशवी चोरली. त्यामध्ये दोन लाख रुपयांची रोख रक्कम होती. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

– मंगळसूत्र चोरीच्या घटनांत वाढ
– कल्याण : भोईरवाडी येथे राहणाऱ्या कविता बाविस्कर या पॅराडाइज हॉटेलसमोरील गल्लीतून जात असताना दोन अनोळखी मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. जोकर चित्रपटगृहाजवळ राहणाऱ्या पुष्पा रोकडे या सनई मंगल कार्यालयासमोरील रस्त्याने जात असताना मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरले. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शोभा मंकिकर ही महिला या ठाणे येथील तीन हात नाका भागातीलीएमटी स्टॉपवर बसची वाट पाहात उभी असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– कारची काच फोडून चोरी
– ठाणे : घोडबंदर रोड येथे राहणारे सचिन श्रीवास्तव हे कुटुंबासोबत रविवारी वसंत विहार येथील वेज सिझलर्स हॉटेलमध्ये जेवणास गेले होते. त्या वेळी त्यांनी हॉटेलसमोर कार उभी केली होती. या कारची मागील काच फोडून त्यातील मोबाइल, सोनसाखळी, लॅपटॉप आदी ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

– आठ जुगारी अटकेत
– कल्याण – कल्याण-कसारा मार्गावर आंबिवली स्टेशनजवळील मोहना गेटजवळील एका हॉटेलमागे असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा मारून पोलिसांनी आठ जणांना अटक केली. ही कारवाई शनिवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तीन पत्ती जुगार साधनांसह दोन हजार आठशे तीस रुपये रोकड जप्त केली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल केला आहे.

– ठाणे, डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कारवाई
– डोंबिवली : गांधीनगर शिळफाटा रोड येथे चायनीज विक्री करणाऱ्या स्वतंत्रकुमार ओमप्रकाश गुप्ता या व्यावसायिकास टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. उघडय़ावर खाद्यपदार्थ ठेवून मानवी जीवनास धोका निर्माण होईल म्हणून त्याच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ठाणे येथील खोपट येथील महापालिका शाळा क्र. १३ च्या समोरील रोडवर पेठा तळून विक्री करणारा फेरीवाला करमवीर कुमार श्री भगवानलाल याच्याविरोधात राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला आहे. फुटपाथवर रॉकेल स्टोव्ह मांडून त्यावर कढईत तेल टाकून लिव्हर पेठा तळून विक्रीचा व्यवसाय करमवीर करीत होता. रस्ताने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच ठाणे जनता सहकारी बँकेच्या समोरील फुटपाथवरील बाकडय़ावर स्टोव्ह मांडून त्यावर कढईत तेल टाकून खिमा पॅटिस विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शिवकुमार कुंज या फेरीवाल्याच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.